Pimpri: सचिन पटवर्धन यांची नियुक्ती रद्द, शहरातील राज्यमंत्री दर्जाचे दुसरे पद गेले

एमपीसी न्यूज – भाजप सरकारने केलेल्या महामंडळावरील नियुक्त्या राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकासआघाडी सरकारकडून टप्प्या-टप्प्याने रद्द करण्यात येत आहेत. सोमवारी (दि.2) राज्यस्तरीय लेखा समितीवरील नियुक्त्या रद्द केल्या आहेत. त्यामध्ये लेखा समितीचे अध्यक्ष असलेले पिंपरी-चिंचवड शहरातील अॅड. सचिन पटवर्धन यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे पटवर्धन यांचा राज्यमंत्रीपदाचा दर्जा गेला आहे.

राज्यात 2014 मध्ये भाजपची सत्ता येताच पिंपरी-चिंचवड शहर भाजपमधील जुन्या नेत्यांना अच्छे दिन आले होते. सचिन पटवर्धन यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेले राज्य लेखा समितीचे अध्यक्षपद मिळाले होते. जून 2018 मध्ये पटवर्धन यांची समितीच्या अध्यक्षपदी फेरनिवड देखील झाली होती. अमर साबळे यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली. सदाशिव खाडे यांना पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे  (पीसीएनटीडीए) अध्यक्षपद मिळाले. लोकसभा निवडणुकीनंतर अमित गोरखे यांना लोकशाहिर अण्णाभाऊ साठे  विकास महामंडळाचे अध्यक्षपद मिळाले.

विधानसभेच्या 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर होत महाविकासआघाडीचे सरकार आले. भाजप सरकारने केलेल्या महामंडळावरील नियुक्त्या राज्यातील नव्या सरकारने रद्द करण्यास सुरुवात केली.  पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदावरुन सदाशिव खाडे यांना 3 फेब्रुवारी 2020 रोजी पदमुक्त केले.   पीसीएनटीडीएचा कारभार  पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्याकडे सोपविला.

आता सचिन पटवर्धन यांची देखील नियुक्ती रद्द केली आहे. त्यामुळे राज्यमंत्री दर्जाची शहरातील दोनही पदे गेली आहेत. गोरखे यांची नियुक्ती कायम आहे. परंतु, त्यांना काम करण्यास अडचण येत आहे. तर, खासदार अमर साबळे यांची पुढील महिन्यात मुदत संपत आहे. त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.