Pune : प्रतिबंधित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यास सूट, आवश्यकता असेल तरच उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

state govt employes municipal corporation employees from containment area cannot join work unless highly essential says pune collector

एमपीसी न्यूज –  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर काम करणाऱ्या व  प्रतिबंधित क्षेत्रातून कामावर हजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यास सूट देण्यात आली आहे. मात्र प्रतिबंधित क्षेत्र कालावधी समाप्त झाल्यानंतर व तातडीचे शासकीय काम असल्यास कार्यालय प्रमुखांनी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले तर कर्मचाऱ्यांनी तात्काळ कामावर  हजर रहावे, असा आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे.

पुणे जिल्हयातील पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, छावणी परिषद पुणे, खडकी, देहुरोड व जिल्हादंडाधिकारी पुणे यांचे कार्यक्षेत्रातील परिसर प्रतिबंधित क्षेत्र ( कंटेन्मेंट झोन) म्हणून घोषित केलेले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाला प्रतिबंधित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनावरील कर्मचारी रोज कार्यालयात उपस्थित राहत आहेत.

यापैकी काही कर्मचारी  प्रतिबंधित क्षेत्रातून येत आहेत त्यामुळे त्यांना कामावर हजर राहण्यास तात्काळ बंद करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी म्हटले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी अशा कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यास सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार जे कर्मचारी घोषित केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रातून कामावर हजर राहतात त्यांनी संबंधित कार्यालय प्रमुखांना लेखी स्वरूपात माहिती कळवणे गरजेचे आहे. संबंधित कार्यालय प्रमुख नमूद क्षेत्राची माहिती तपासून संबंधित कर्मचाऱ्यास कामावर हजर राहण्यास सूट देतील.

मात्र प्रतिबंधित क्षेत्र कालावधी समाप्त झाल्यानंतर व तातडीचे शासकीय काम असल्यास कार्यालय प्रमुखांनी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले तर कर्मचाऱ्याला तात्काळ कामावर हजर रहावे लागणार आहे.

तसेच एखादे क्षेत्र प्रतिबंधित म्हणून नव्याने घोषित करण्यात आले असेल तरीसुद्धा वरील प्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.