Talegaon Dabhade News : सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांचे महावितरणच्या उपअभियंत्यांना निवेदन

वीज पुरवठा न तोडण्याची केली मागणी 

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील सर्व पक्षीय कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र विद्युत महामंडळाच्या तळेगाव विभागाचे प्रमुख  उपअभियंता राजेंद्र गोरे यांना तळेगाव दाभाडे परिसरातील विद्युत पुरवठा थकीत बिलांअभावी खंडित न करण्याबाबतचे निवेदन बुधवार (दि 3) रोजी दिले.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालक मंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (दि 2) रोजी विधिमंडळात थकीत बिलांमुळे रहिवासी वीज जोडणी धारक व शेतकरी यांचा वीज पुरवठा पुढील निर्णय होई पर्यंत तोडू नये अशी घोषणा केली होती.  त्यामुळे राज्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

परंतु तळेगाव दाभाडे परिसरात विद्युत महामंडळाचे कर्मचारी थकीत बिलांबाबत तगादा लावत असल्याचे निदर्शनास आले आहे, तसेच थकीत बिले न भरणाऱ्या ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करत असल्याच्या तक्रारी येत असल्यामुळे जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पक्षीय पदाधिका-यांनी उपअभियंता राजेंद्र गोरे यांना भेटून परिसरातील नागरिकांच्या व्यथा निवेदनातून मांडल्या.

_MPC_DIR_MPU_II

तळेगाव स्टेशन येथील  व्यापारी भरत वस्तीमल ओसवाल यांच्या घराचा विद्युत पुरवठा तोडण्यात आला, सदर विद्युत कर्मचारी यांना वारंवार विनंती करूनही ते थकीत बिलांबाबत आडून बसले होते. परंतु भरत वस्तीमल ओसवाल यांनी जनसेवा विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क साधल्यानंतर वीज पुरवठा पुन्हा  जोडण्यात आला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा करूनही विद्यूत कर्मचारी जर वीज बिलांबाबत आडून बसणार असतील तर सर्वपक्षीय पदाधिकारी आंदोलनाच्या मार्गाने प्रश्न  सोडवतील असे युवा नेते चिराग खांडगे यांनी नमूद केले.

लॉकडाउन मुळे आर्थिक अडचणीत असणाऱ्या नागरिकांना थकीत बिलांबाबत सुलभ हफ्ते करून द्यावेत तसेच विद्युत कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा कुठल्याही कारणास्तव तोडू नये असे नगरसेवक  संतोष शिंदे यांनी सांगितले.

विद्युत महामंडळाचे उपअभियंता राजेंद्र गोरे यांनी सर्व पक्षीय शिष्टमंडळाला सहकार्य करण्याचे व थकीत वीज बिलांसाठी 3 ते 4 सुलभ हफ्ते करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

निवेदन देण्यासाठी  नगरसेवक संतोष शिंदे , युवा नेते चिराग खांडगे, जनसेवा विकास समिती प्रवक्ता मिलिंद अच्युत, रिपब्लिकन पार्टी तळेगाव शहराध्यक्ष सुनील पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग अध्यक्ष केशव कुल, शिवसेना माजी शहराध्यक्ष सुनील उर्फ मुन्ना मोरे, अनिल धर्माधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते, विद्यूत महामंडळाच्या वतीने उपअभियंता राजेंद्र गोरे यांनी निवेदन स्वीकारले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.