Statement of Sushant’s Father: मुंबई पोलिसांच्या जबाबात रियाचे नावदेखील नाही

मी पाटण्यातील घरी होतो आणि 14 जून रोजी 2.30 वाजता टीव्हीवरुन कळलं की, सुशांतनं आत्महत्या केली आहे. त्यानंतर माझी शुद्ध हरपली व मला चक्कर येऊ लागली.

एमपीसी न्यूज – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता सीबीआयने देखील ही आत्महत्याच असू शकते असे मानण्यास हरकत नसावी असे मान्य केले आहे. बिहार सरकारच्या म्हणण्यावरुन मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे हा तपास सोपवण्यात आला आहे. सुशांतसिंहचे वडील के. के. सिंह यांनी घटनेनंतर मुंबई पोलिसांकडे नोंदवलेला जबाब समोर आला आहे. विशेष म्हणजे त्यावेळी के. के. सिंह यांनी रिया चक्रवर्तीचं नावही घेतलं नव्हतं.

‘आजतक’ने यासंदर्भात दिलेल्या वृत्तानुसार सुशांतच्या वडिलांनी मुंबई पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबानुसार 14 जूनच्या आधी सुशांतची प्रकृती बरी नव्हती. 7 जून रोजी त्यांचे आणि सुशांतचं बोलणं झालं होतं. विशेष म्हणजे सिंह यांनी सुशांतनं आत्महत्या केल्याची शक्यताही व्यक्त केली होती.

‘माझा मुलगा सुशांत मुंडन कार्यक्रमासाठी 13 मे 2019 रोजी पाटण्याला आला होता. त्यावेळी आमची भेट झाली होती. 15 मे 2019 रोजी सुशांतचा मुंडण कार्यक्रम झाला होता. त्यावेळी तो तणावाखाली नव्हता. 16 मे रोजी तो मुंबईला निघून आला. मी त्याला व्हॉट्सअॅपवर मेसेज करायचो. तो उत्तरही द्यायचा. मी त्याला जास्त कॉल करत नव्हतो, कारण तो बहुतांश वेळा कामात व्यस्त असायचा.

सुशांतच मला कॉल करायचा. तोच मला माझ्या तब्येतीविषयी विचारायचा. त्यानंतर सुशांतनं मला 7 जूनला कॉल केला होता. त्यावेळी मी त्याला बोललो होतो की तुला पाटण्याला येऊन खूप वेळ होऊन गेला आहे. तुला वाटत असेल, तर पाटण्याला ये. त्यावर त्याने बघतो असं सांगितलं. माझी तब्येत चांगली नाही. तब्येत चांगली झाल्यावर येईल’, असं सुशांतच्या वडिलांनी जबाबात म्हटलं आहे.

‘मी पाटण्यातील घरी होतो आणि 14 जून रोजी 2.30 वाजता टीव्हीवरुन कळलं की, सुशांतनं आत्महत्या केली आहे. त्यानंतर माझी शुद्ध हरपली व मला चक्कर येऊ लागली. मी माझा भाचा नीरज सिंह आणि काही नातेवाईकांना घेऊन मुंबईला पोहोचलो. सुशांतवर विलेपार्लेमध्ये 15 जून रोजी सायंकाळी 5 ते 6 वाजताच्या सुमारास सुशांतवर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर मी सुशांतच्या भाड्यानं घेतलेल्या वांद्रे येथील फ्लॅटवर गेलो.

मी कुणाला काहीच बोललो नाही आणि विचारलंही नाही. माझ्या मुलानं आत्महत्या का केली? याची मला माहिती नाही. त्यानं माझ्यासोबत कधी तणावाविषयी चर्चा केली नाही. माझी सुशांत प्रकरणात कोणतीही शंका वा तक्रार नाही. मला वाटत सुशांतनं आत्महत्या केली असावी’, असं सुशांतच्या वडिलांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे.

सुशांतच्या कुटुंबाचे वकील विकास सिंह यांनी मात्र वेगळेच सांगितले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मुंबई पोलिसांनी हा जबाब मराठीत लिहून समोर ठेवला होता आणि सुशांतच्या कुटुंबीयांना मराठी समजत नाही. त्यामुळे सुशांतच्या वडिलांच्या या म्हणण्याऐवजी त्यांनी पाटण्यात जो जबाब दिला आहे त्याचाच विचार करण्यात यावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.