Pimpri : रिक्षा चालकांचे प्रश्न न सोडविल्यास राज्यव्यापी संपाचा इशारा

 

एमपीसी न्यूज – रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ तातडीने स्थापन करावे, हाकिम समितीच्या सुत्रानूसार भाडेवाढ मिळावी, ओला-उबेरसह महाराष्ट्रातील बेकायदेशील वाहतूक बंद करण्यात यावी, रिक्षा पासिंगसाठी, आरटीओ हद्दीमधे व्यवस्था करण्यात यावी. यासह महाराष्ट्रातील रिक्षा चालक मालकांचे प्रश्न महाराष्ट्र शासनाने सोडवावेत, अन्यथा मुंबई, पुणे, नागपूरसह महाराष्ट्रात टप्प्या टप्प्याने तीव्र आंदोलन करून संप पुकारण्याचा इशारा रिक्षा चालक-मालकांनी दिला आहे.

नवी मुंबई येथे रिक्षा संघटनेच्या पदाधिका-यांचा मेळावा घेण्यात आला. आमदार संदीप नाईक यांनी मेळाव्याचे उद्घाटन केले. नवी मुंबई कृती समिती अध्यक्ष भरत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मेळाव्यास कृती समिती अध्यक्ष शशांक राव, सरचिटणीस बाबा कांबळे (पिंपरी चिंचवड पुणे), प्रमोद घोणे (मुंबई), सल्लागार मधुकर थोरात (पनवेल), उपाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे (जळगाव ), सहसचिव मच्छिंद्र  कांबळे, सुरेश शिंदे (लातूर), आनंद तांबे (पुणे), मारुती कोंडे, सुनील बोर्डे, वसंत पाटील, विजय पाटील, पद्धमकर मेहेर आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील सर्व संघटनांनी वरील मागण्यांचे आणि आपापल्या भागातील मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी आणि आरटीओ कार्यालयात तातडीने द्यावे. २७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकारी आणि आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. यानंतर देखील मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी संप पुकरण्यात येईल, असे शशांक राव यांनी जाहीर केले.

रिक्षा चालकांचे प्रश्न विधानसभेत मांडण्याचे आश्वासन आमदार संदीप नाईक यांनी दिले. महाराष्ट्रातील मंत्र्यांना नवी मुंबईत आडवा,  मंत्रालयात जाऊ देऊ नका, असे कामगार नेते बाबा कांबळे म्हणाले. पुण्यातील जाहिरात फलक दुर्घटनेतील मृत्यू पावलेले रिक्षाचालक शिवाजी परदेशी आणि इतरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ज्ञानेश्वर कोळी, श्रीरंग जाधव, संजय बाबर, आनंद नायकरे, किशोर तिनांनी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.