Pimpri : आता रेशनिंग दुकानात मिळणार स्टेशनरी साहित्य 

एमपीसी न्यूज – राज्यातील रेशनिंग दुकानातून स्टेशनरी वस्तू विक्रीला अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने हिरवा कंदील दर्शविला आहे. परंतु, त्यांचे तुलनात्मक दर काय असतील हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

राज्यातील रास्तभाव दुकानदारांचे उत्पन्न वाढावे यासाठी रास्तभाव दुकानातून सार्वजनिक व्यवस्थेअंतर्गत वितरीत होणाऱ्या वस्तूंसह गहू, तांदूळ, खाद्यतेल, कडधान्ये, डाळी, गुळ, शेंगदाणे, रवा, मैदा, चणापीठ, भाजीपाला व इतर खुल्या बाजारातील वस्तू तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थ, प्रमाणित बी-बियाणे, कोल्हापूर जिल्हा खादी ग्रामोद्योग संघ यांनी उत्पादित केलेल्या सर्व वस्तू विक्री करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्याच धर्तीवर रास्तभाव, शिधावाटप दुकानांमध्ये स्टेशनरी वस्तू विक्रीसाठी ठेवण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

राज्यातील रास्तभाव दुकानदारांचे उत्पन्न वाढावे यासाठी रास्तभाव दुकानांमध्ये स्टेशनरी वस्तू व शाळेसाठी उपयुक्त साहित्य विक्रीसाठी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या वस्तूंचे दुकानापर्यंत वितरण व विक्रीपोटी मिळणारे कमिशन याबाबत रास्तभाव दुकानदारांनी संबंधित कंपनीच्या वितरकांशी परस्पर संपर्क साधावा. हा व्यवहार संबंधित कंपनी व त्यांचे घाऊक व किरकोळ वितरण आणि रास्तभाव दुकानदार यांच्यामध्ये राहील, यात शासनाचा कोणताही सहभाग अथवा हस्तक्षेप राहणार नाही, असे या अध्यादेशात नमूद आहे. शासनाचे अवर सचिव प्र. गि. चव्हाण यांनी याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे. यासंबंधी कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

शासनाने वितरणाची प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी कामकाज ऑनलाइन करण्यावर भर दिला जात आहे. स्वस्त धान्य दुकानात माल केव्हा आला, त्याचे वितरण कधी होणार याची माहिती नागरिकांना होण्यासाठी एसएमएस प्रणाली सुरू केली आहे. नागरिकांच्या तक्रारींसाठी ऑनलाइन तक्रारीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानंतर आता स्टेशनरी व शालेय वस्तू रास्त दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, तुलनात्मक दराबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने नागरिकांना स्टेशनरी साहित्य रास्त भावात मिळणार का, याबाबत साशंकता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like