Hinjawadi : दारू न दिल्याने पोलिसाचा हॉटेलमध्ये राडा

एमपीसी न्यूज – दारु न दिल्याचा राग आल्याने पुणे शहर पोलीस दलातील एका मद्यधुंद पोलीस शिपायाने तोडफोड करत हॉटेलमध्ये राडा घातला. तसेच, हॉटेल चालकाला शिवीगाळ करत दमदाटी केली. हा प्रकार रविवारी (दि. ४) मध्यरात्री एकच्या सुमारास हिंजवडी येथे घडला.

हॉटेल मालक रामकिसन रमेश खैरनार (वय ३२, रा. हिंजवडी) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलीस शिपाई अक्षय धुमाळ आणि अजय खोत यांच्यासह अन्य तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामकिसन यांचे हिंजवडी येथील आदर्शनगरमध्ये हॉटेल आहे. रविवारी रात्री या ठिकाणी पोलीस शिपाई धुमाळ हा त्याच्या साथीदारांना घेऊन आला. ‘आम्ही पोलीस आहोत, तू आमच्या माणासाला त्या दिवशी दारु का दिली नाही’, असे म्हणून त्यांनी रामकिसन यांना शिविगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी धुमाळ यांना अनेकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी खात्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची नावे घेत धिंगाणा घालण्यास सुरुवात केली.

हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर धुमाळ याने पार्क केलेल्या दुचाकींना लाथा मारल्या. तसेच चायनीज दुकानाची काच देखील फोडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. धुमाळ याने पोलीस असल्याचे सांगून राडा केल्याने हॉटेल मालकासह इतर कामगारही घाबरले. याबाबत सोमवारी रात्री उशिरा रामकिसन यांनी तक्रार दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.