Bhoshri: सावत्र आईची मुलांना मारहाण

एमपीसी न्यूज – सावत्र आई आणि वडिलांनी दोन लहान मुलांना मारहाण केल्याची घटना कासारवाडी येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी आई-वडिलांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हा प्रकार 25 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान कासारवाडी येथे घडला 
नूपुर पाटील (वय 10) आणि शिवम (वय साडेतीन वर्ष) अशी मारहाण झालेल्या मुलांची नावे आहेत. याप्रकरणी ज्ञानेश्‍वर पाटील (वय 38), अश्‍विनी पाटील (वय 32, दोघेही रा. नाशिकफाटा, कासारवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुलांचे आजोबा भिवसन दादाजी कापडणीस (वय 61, रा. सटाणा, जि. नाशिक) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नूपुर आणि शिवम यांच्या आईचे निधन झाले आहे. यामुळे त्यांचा सांभाळ वडील ज्ञानेश्‍वर आणि सावत्र आई अश्‍विनी हे दोघेजण करीत आहेत.  25 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2018 या कालावधीत वडील ज्ञानेश्‍वर आणि सावत्र आई अश्‍विनी या दोघांनी नूपुर आणि शिवम या दोघांना फरशी पुसण्याच्या दांडक्‍याने बेदम मारहाण केली. याबाबत नूपुर हिने आपल्या आईचे वडील भिवसन आणि मामाला सांगितले. मारहाणीचे फोटो आजोबा आणि मामाला पाठविले. त्यानंतर आजोबांनी पुण्यात धाव घेत भोसरी पोलीस ठाण्यात मुलांची सावत्र आई आणि वडिलांच्या विरोधात तक्रार दिली. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.