Mumbai : विलगीकरण केंद्रात दूरचित्रवाणी, कॅरमबोर्ड, जेवण द्या; राज्य सरकारच्या प्रशासनाला सूचना

एमपीसी न्यूज – राज्यातील विलगीकरण केंद्रातून कोरोनाचे संशयित आणि बाधित काहीजण पळून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. कोरोनाच्या साथीवर अद्याप औषध निर्माण झालेले नसल्याने लागण झालेला रुग्ण समाजात गेला. तर त्याची इतरांना बाधा होण्याचा संभव असतो. त्यासाठी त्यांना विलगीकरण केंद्रात ठेवले जाते. तिथे त्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी विलगीकरण केंद्रात दूरचित्रवाणी, कॅरमबोर्ड, जेवण देण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित प्रशासनाला दिल्या आहेत.

याबरोबरच राज्य शासनाने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, प्रशासनाने योग्य ती कठोर पावले उचलावीत याबाबतही सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (दि. 16) सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, मुख्य सचिव अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास उपस्थित होते.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या महत्वपूर्ण सूचना –

# राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

# ग्रामीण भागातील शाळा बंद राहणार

# सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या परीक्षा ३१ मार्च पर्यंत पुढे ढकलल्या

# कोरोनाच्या उपाययोजनांसाठी तातडीच्या निधीची तरतूद

कोरोना साथीच्या उपाय योजनांसाठी 45 कोटींचा पहिला हप्ता देण्यात येणार आहे. त्यामध्ये कोकण आणि पुणे विभागीय आयुक्तांना प्रत्येकी 15 आणि 10 कोटी रुपये तर नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्तांना प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

# क्वॉरंटाईन (विलगीकरण) सुविधा असलेल्या ठिकाणी दूरचित्रवाणी, कॅरमबोर्ड, जेवण आदी सुविधा देणे

# ज्यांना 100 टक्के घरी क्वॉरंटाईनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारावा, ज्यामुळे समाजात संबंधित व्यक्ती वावरताना आढळल्यास त्यांची ओळख पटेल.

# केंद्र शासनाने ज्या सात देशांचा प्रवास करुन आलेल्यांना सक्तीचे क्वॉरंटाईन करण्याच्या सूचना केल्या आहेत, त्यामध्ये राज्य शासनाकडून दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिका यां देशांचाही समावेश करण्यात आला आहे.

# आवश्यकता भासल्यास व्हेंटिलेटर आणि अन्य उपकरणे स्थानिक बाजारातून खरेदी करण्याचे जिल्हा प्रशासनाला अधिकार

# मंगळवार (दि. 17) पासून मंत्रालयात अभ्यागतांना (व्हिजिटर्स) प्रवेश देण्यात येणार नाही

# नागरिकांनी शासकीय कार्यालयात गर्दी न करता ई-मेलच्या माध्यमातून तक्रारी, अर्ज पाठवावेत. त्यावर जिल्हा प्रशासनाने सात दिवसात कार्यवाही करावी

# होम क्वॉरंटाईन असलेल्या व्यक्तींची विचारपूस करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी

# धर्मगुरु, लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन व्यापक जनहितासाठी कायद्याचा प्रभावी वापर करावा

# सर्व प्रकारच्या कारवाई करताना त्याला मानवी चेहरा असावा, असे आवाहन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.