Chinchwad News : कोयत्याचा धाक दाखवून रोकड चोरली, दोन वाहनांची तोडफोड केली; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – तिघांनी मिळून दोघांना कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ करत एकाच्या खिशातील 700 रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने चोरुन घेतली. त्यानंतर  रिक्षा आणि कारची तोडफोड केली. हा प्रकार रविवारी (दि. 13) रात्री साडेबारा वाजताच्या दरम्यान पत्राशेड झोपडपट्टी, लींकरोड, चिंचवड येथे घडला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

किरण पवार, अविनाश साळवे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह रोहित उर्फ जाड्या साळवे (सर्व रा. पत्राशेड, लिंकरोड, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कोमल बाबु खैरारिया (वय 24, रा. पत्राशेड झोपडपट्टी, लिंकरोड, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास आरोपी हातात कोयते घेऊन आरडाओरडा करत फिर्यादी यांच्या घराजवळ आले. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांना शिवीगाळ करत कोयत्याचा धाक दाखवून वडिलांच्या खिशातून 700 रुपये जबरदस्तीने काढून घेतले.

त्यानंतर रिक्षाची (एम एच 12 / एफ झेड 6411) तोडफोड करून नुकसान केले. त्यानंतर आरोपी हवेत कोयते फिरवत दहशत पसरवून निघून गेले. फिर्यादी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येत असताना लिंक रोडवरील पुलाखाली एक लाल रंगाच्या कारची (एम एच 14 / ए पी 4839) देखील तोडफोड झाल्याचे दिसले. त्या कारचीही आरोपींनी तोडफोड केल्याचे फिर्यादी यांना समजले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.