Chinchwad : अंत्यविधीसाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरी

एमपीसी न्यूज – वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या अंत्यविधीसाठी गावी गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरटयांनी चोरी केली. यामध्ये चोरटयांनी 2 लाख 19 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी (दि.14) रात्री दहा ते रविवारी (दि.15) पहाटे साडेपाचच्या दरम्यान वाल्हेकरवाडी येथे घडली.

बाबुराव भास्कर दराडे (वय 42, रा. आगा कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दराडे यांच्या वडिलांचे 3 ऑक्‍टोबर रोजी निधन झाले. त्यानंतर अंत्यविधी नंतरच्या कामासाठी दराडे कुटुंब शनिवारी (दि.14) रात्री दहा वाजता त्यांच्या मुळ गावी गेले. दरम्यान बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील एलईडी टीव्ही व कपाटातील सोन्याचे दागिने असा एकूण 2 लाख 19 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. रविवारी (दि.15) पहाटे साडेपाचच्या सुमारास दराडे कुटुंबीय घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.