पिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारीला आळा घाला, अमित बच्छाव यांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आयुक्‍तालय सुरू करण्यात आले आहे. मात्र शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. मुलींवर अत्याचारापासून, चोरी व खूनांपर्यंतच्या अनेक घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे गुन्हेगारांवर वचक बसवून गुन्हेगारीला आळा घाला, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, कासारसाई येथे एका मुलीवर अत्याचाराची घटना घडली. या बरोबरच शहरातील विविध ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटना घडत आहेत. शहरातील अनेक परिसरात वाहने फोडण्याचे सत्रही थांबता थांबेना झाले आहे. परिसरात टोळक्यांकडून दहशत पसवली जात आहे. वाहने फोडण्याच्या प्रकाराला आळा घालताना पोलिसांना अपयश येत असल्याचे चित्र आहे. शहरात खूनासारखे प्रकारही वारंवार घडत आहेत. यामुळे नागरिक भितीच्या सावटाखाली आहेत. शहराचा वाढता परिसर पाहता पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालय दिले आहे. हे कार्यालय सुरू झाल्यापासून गुन्हेगारांवर आळा बसेल अशी अपेक्षा शहरातील नागरिकांची होती. गुन्हेगारांवर वचक बसवून नागरिकांना सुरक्षा द्यावी. या बरोबरच राज्याला स्वतंत्र गृहमंत्री द्यावा, अशी मागणी अमित बच्छाव यांनी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.