Pune News : शहराबाहेरील पुनर्वसनाविरोधात मेट्रोबाधितांचे टाळे ठोको आंदोलन ; जागीच पुनर्वसन करण्याची मागणी

एमपीसीन्यूज : महापालिका प्रशासनाने मेट्रोबाधित झोपडपट्टीतील नागरीकांशी कोणत्याही प्रकारचा संवाद न साधता परस्पर निर्णय घेत मध्यवर्ती भागातून 15 किलोमीटर लांब पुनर्वसनाचा अंतिम आदेश काढला. याविरोधात कामगार पुतळा झोपडपट्टी कृती समितीच्या वतीने शिवाजीनगर येथील महामेट्रोच्या कार्यालयास टाळे ठोको आंदोलन करण्यात आले.

स्थानिक नागरिक भाऊ शिंदे, अशोक लोखंडे, अप्पा आखाडे, सलीम मुल्ला, सुनिल गादेकर, सविता वाघमारे, महेंद्र कांबळे यांनी मेट्रोच्या कार्यालयास टाळे ठोकत आंदोलन केले. तर, वसाहतीतील अन्य नागरीकांनी हाताला काळ्या फिती बांधत साखळी करून प्रशासनाच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी करत शहराबाहेरील पुनर्वसनाच्या निर्णयाचा निषेध नोंदविला.

कामगार पुतळा झोपडपट्टी ही अधिकृत झोपडपट्टी म्हणून 1974 साली घोषित करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रस्तावही मंजूर आहे.

मात्र, गेल्या 12 वर्षांपासून झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रेंगाळला आहे. मागील आठवड्यात महापालिकेने जाहीर प्रकटन करत 27 ऑक्टोंबर पर्यंत झोपडीधारकांना पुरावे सादर करण्यासाठी अंतिम संधी देणारे निवेदन दिले.

प्रत्यक्षात येथील नागरीकांशी पुनर्वसनाबाबत चर्चा करणे अपेक्षित होते. मात्र, त्याची तसदी न घेता प्रशासनाने परस्पर निर्णय घेत नागरीकांवर दबाव आणत पुनर्वसन शहराबाहेर करण्याचा घाट घातला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

शुक्रवारी (दि. 16) पार पडणार बैठक

कामगार पुतळा व राजीव गांधीनगर झोपडपट्टी मेट्रो प्रकल्पामुळे बाधितांच्या पुनर्वसनाबाबत चर्चा करण्यात येईल. त्याअनुषंगाने येत्या शुक्रवारी दुपारी दोन वाजता महामेट्रोचे संचालक रामनाथ सुब्रमण्यम यांच्या बरोबर कामगार पुतळा झोपडपट्टी कृती समितीच्या पदाधिकार्‍यांबरोबर बैठक पार पडेल.

यावेळी, योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पुणे मेट्रो रेल प्रकल्पाचे महाव्यवस्थापक (प्रशासन) डॉ. हेमंत सोनवणे यांनी परिपत्रकाद्वारे दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.