Left Handers Day: आज ‘डावे’ हे उजवे आहेत…

Story on International Lefthanders Day 2020 डावखुरे लोक आपल्या अद्वितीयपणा आणि अंगात वेगळ्या गुणामुळे आपली वेगळी ओळख निर्माण करतात असेदेखील म्हटले जाते. त्याची इतिहासापासून ते आजपर्यंत उदाहरणे आहेत.

एमपीसी न्यूज – एखाद्या वेळी आपण सहजगत्या म्हणून जातो की, याने ना अमूक गोष्टीत फारच ‘डावे-उजवे’ केले. कोणाकडे मुद्दाम दुर्लक्ष केले की टीका होते, की त्याला डावलले. म्हणजे होते काय की, आपण नकळतच का होईना डाव्या बाजूला कमी प्रतीचे मानतो आणि उजवे ते सगळे सरस असे समजतो. एखादे चांगले काम झाले की लगेच हे काम उजवे झाले अशी प्रतिक्रिया दिली जाते. आपल्या लहानपणापासूनच वाम म्हणजे डावा म्हणजे तो कमी प्रतीचा हा समज आपल्या मनावर बिंबवलेला असतो.

माणसाच्या याच वृत्तीला दूर सारण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय डावखुरा दिवस’ साजरा केला जातो. आज 13 ऑगस्ट. आंतरराष्ट्रीय डावखुरा दिन. हा दिवस पहिल्यांदा 13 ऑगस्ट 1976 मध्ये साजरा करण्यात आला. उजव्या हाताने काम करणे कधीही सोयीचे असते हा समज दूर करण्यासाठी आणि समाजातील डावखुऱ्या असणाऱ्या लोकांविषयी जागरुकता आणण्याच्या दृष्टीने हा दिवस साजरा करण्यात येतो.

जगाच्या लोकसंख्येपैकी 7 ते 10 टक्के लोक आपल्या डाव्या हाताने आपली सर्व कामे करतात. अर्थात हे लोक डावखुरे म्हणून ओळखले जातात. डाव्या हाताने काम करणारे काहीजण त्यांच्या उजव्या हातानेदेखील तेवढ्याच चपखलपणे काम करतात.

पण हेच डावखुरे लोक आपल्या अद्वितीयपणा आणि अंगात वेगळ्या गुणामुळे आपली वेगळी ओळख निर्माण करतात असेदेखील म्हटले जाते. त्याची इतिहासापासून ते आजपर्यंत उदाहरणे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

डावखुऱ्या व्यक्तींच्या यादीत आज अनेक दिग्गज नेते, संशोधक, अभिनेते, खेळाडू यांचा समावेश आहे. ज्यांनी आपल्या या डाव्या हाताच्या वापराला कधीच कमी न लेखता आयुष्यात यश संपादन केले आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी, अभिनेता चार्ली चॅप्लिन, उद्योजक रतन टाटा, शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन, हॉलिवूड अभिनेत्री मर्लिन मन्रो, ज्युलिया रॉबटर्स, क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, सुरेश रैना, युवराज सिंह, बॉक्सर मेरी कोम, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डावखुऱ्या लोकांच्या यादीत समावेश केला जातो.

भारतात संदीप विष्णोई यांनी ‘इंडियन लेफ्ट हँडर्स क्लब’ची स्थापना केली असून क्लबचे एक लाखावर सदस्य आहेत. डावखु-या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, डावखु-या महिला उद्योजकांना आर्थिक साहाय्य तसेच इतर योजना या संस्थेमार्फत नियमितपणे राबविल्या जातात.

अचाट गुणवत्तेने जगभरात नावलौकिक मिळविलेल्या डावखुऱ्या व्यक्ती सर्वांच्या परिचयाच्या आहेत, पण ते ‘डावखुरे’ असल्याची माहिती सर्वांना असेलच, असे नाही. पण त्यांचे कर्तृत्व हे सर्वांनाच परिचयाचे आहे. त्यामुळे डावखुरे होणे हे न्यूनगंड न मानता तसेच डावखुऱ्या लोकांविषयी गैरसमज न करुन घेता त्यांना देखील तेवढ्याच मानाने वागवले पाहिजे हाच या दिवसाचा खरा संदेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.