Pune News: पुणे-बंगळुरू महामार्गावर विचित्र अपघात, आठ वाहने एकमेकांना धडकली

एमपीसी  न्यूज: पुण्यातील कात्रज परिसरातील पुणे बंगळुरू महामार्गालगत असणाऱ्या सर्विस रस्त्यावर आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एक विचित्र अपघात झाला. या अपघातात सात ते आठ वाहने एकमेकांवर धडकली. या अपघातात चार ते पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळुरू महामार्गावरील जांभूळवाडी रस्त्यावर आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एक कंटेनर एका वाहनाला धडकला. यामध्ये चालक आणि क्लीनर अडकून पडले होते. त्यांची सुटका करण्याचे काम सुरू असताना पाठीमागे आणखी काही वाहने टाकली होती. या वाहनांना पाठीमागून आलेल्या आणखी एका कंटेनरने धडक दिली. त्यामुळे पुढील सर्व वाहने एकमेकांवर धडकून हा विचित्र अपघात झाला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिंहगड रस्ता पोलीस पीएमआरडीएचे अग्निशमन दलाचे जवान  यांनी घटनास्थळी धाव घेऊन या अपघातात जखमी झालेल्या नागरिकांची सुटका केली आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर या मार्गावर काहीवेळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.