Strange Coincidence: ‘त्या’ तिघांच्या आयुष्यातील विचित्र योगायोगाची माध्यमांमध्ये चर्चा

Strange Coincidence - The media discusses the strange coincidence in the lives of 'those' three जोकरला वैयक्तिक दु:ख असेल तरी त्याने लोकांना हसवलेच पाहिजे असा दंडक असतो. सुशांतच्या आत्महत्येनंतर अशाच एका विचित्र योगायोगाची खूप चर्चा होत आहे.

एमपीसी न्यूज – सामान्यपणे जोकर, विदूषक याचे काम असते ते लोकांचे मनोरंजन करणे, चित्रविचित्र हावभाव करत लोकांना हसवत ठेवणे. पण या जोकरला वैयक्तिक दु:ख असले तरी त्याने लोकांना हसवलेच पाहिजे, असा दंडक असतो. सध्या एका विचित्र योगायोगाची खूप चर्चा होत आहे.

आपल्या सहजसुंदर अभिनयाने लोकांना मंत्रमुग्ध करणा-या सुशांतसिंह राजपूत या गुणी अभिनेत्याने अचानकपणे आत्महत्या करुन आपले जीवन संपवून टाकले. त्याला कोणते दु:ख होते याचाच आता वेध घेतला जात आहे. सुशांत मानसिक तणावामध्ये होता त्यामधून त्याचे अगदी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

खरंतर गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘छिछोरे’ चित्रपटात नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मुलाच्या वडिलांची भूमिका त्याने साकारली. त्यात त्याने निराशा, अपयश यामुळे आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय चुकीचा आहे, हा संदेश दिला होता. मात्र हा संदेश देणारा सुशांत व्यक्तिगत आयुष्यात जणूकाही हा संदेश विसरला. त्याच्या आत्महत्येच्या वृत्तानंतर अनेक फोटो सोशल नेटवर्किंगवर शेअर केले जात आहेत. त्यामध्ये एक फोटो खास लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

यामध्ये सुशांत सिंह राजपूत, महिन्याभरापूर्वी कॅन्सरने निधन झालेला अभिनेता इरफान खान, आणि बॅटमॅन सिरीजमध्ये जोकरची भूमिका साकारणाऱ्या हिथ लेजर या तिघांच्या मृत्यूनंतर तिघांमधील एक विचित्र योगायोग दाखवणारा हा फोटो आहे. या तिन्ही अभिनेत्यांचे मोठ्या पडद्यावरील शेवटचे सीन जवळजवळ सारखेच होते असा दावा या व्हायरल फोटोमध्ये करण्यात आला आहे.

जोकर ही मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेली व्यक्तिरेखा आहे. ही व्यक्तिरेखा साकारणा-या सर्वच अभिनेत्यांना काही ना काही मानसिक त्रास झाल्याचे दिसून येते. असं असतानाच २००८ साली जोकरची भूमिका साकारणाऱ्या हिथ लेजरने आत्महत्या केली. मात्र या चित्रपटामधील शेवटच्या दृष्यामध्ये हिथ लेजर हा गाडीच्या खिडकीमधून डोकं बाहेर काढून हसताना दिसत आहे.

अभिनेता इरफान खानचे २९ एप्रिल रोजी मुंबईमध्ये निधन झालं. कोलोन इन्फेक्शनमुळे त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र दुसऱ्याच दिवशी सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. कॅन्सरसारख्या आजारावर मात करुन इरफान खानने अंग्रेजी मीडियम या सिनेमाचं शूटींग पूर्ण केलं होतं. या चित्रपटामध्ये मुलीच्या बापाची भूमिका बजावणारा इरफान चित्रपटाच्या शेवटी एक दृष्यामध्ये गाडीच्या खिडकीच्या बाहेर डोकं काढून हसताना दिसत होता. इरफानची ही मोठ्या पडद्यावरील शेवटची झलक ठरली.

हाच दुर्दैवी योगायोग सुशांतच्या बाबतीत देखील घडला. सुशांतचा मोठ्या पडद्यावरील शेवटचा चित्रपट ठरला तो ‘छिछोरे’. या चित्रपटामध्येही सुशांत शेवटच्या काही दृष्यांमध्ये गाडीच्या खिडकीमधून बाहेर बघत हसताना दिसला होता. आत्महत्या करणं हा पर्याय नाही असा संदेश देणाऱ्या या चित्रपटामध्ये सुशांतने मुख्य भूमिका साकारली होती. दुर्देवाने त्यानेच आत्महत्या करुन आपलं आयुष्य संपवलं.

आता या तिघांच्याही या शेवटच्या ऑनस्क्रीन प्रेझेन्सचा कोलाज फोटो व्हायरल होताना दिसत आहे. ट्विटवर अनेकांनी हा फोटो ‘निव्वळ योगायोग’ असं म्हणत ‘शेवटचा चित्रपट आणि शेवटचं हास्य’ या कॅप्शनसहीत शेअर केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.