Pune News: शहरात मोकाट जनावरांचा उच्छाद

एमपीसी न्यूज   : शहरातील सर्वच रस्त्यांवर मोकाट जनावरांचा रात्रंदिवस वावर वाढला आहे. यामुळे वारंवार वाहतूक विस्कळीत होण्याबरोबरच अपघातांचे प्रमाणही कमालीचे वाढले आहे. पालिकेकडून या मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम थांबल्याने रस्त्यावर मोकाटपणे फिरणार्या कुत्र्यांसोबत जनावरांचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरीक त्रस्त आहे.

मोकाट जनावरांच्या कळपांमुळे शहराच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून वाहनचालकांचे जीव धोक्यात आले आहे. मोकाट जनावरांना पडकण्याची मोहीम महापालिकेने मधल्या काळात हाती घेतली असली तरी रस्त्यांवर फिरणाऱ्या जनावरांची संख्या मात्र कमी झालेली नाही.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे शहरातील भटक्या जनावरांवर कारवाई जबाबादारी आणि यासाठी महापालिकेच्या कोंडवाडा विभागाकडुन कारवाई करण्यात येते. तर शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांंच्यावर नसबंदीची शस्त्रक्रीया करण्याची जबाबदारी आरोग्य विभागावर आहे. मात्र, लॉकडाउनच्या काळापासून भटकी जनावरे आणि कुत्री पकडण्याची कारवाई थांबली आहे. परिणामी शहराच्या विविध रस्त्यांवर मोकाटपणे फिरणार्‍या कुत्र्यांसोबत जनावरांचेही प्रमाण वाढले आहे.

कात्रज चौकामध्ये पाच ते सहा गायांचा कळप गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून रस्त्यावरच दिसत आहे. सातारा रस्त्यावर वाहतूकीचे प्रमाण अधिक आहे. मोठ्या वाहनांची संख्या सुध्दा अधिक असल्यामुळे अनेकवेळा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. काही केल्या हा जनावरांचा कळव रस्त्यामधून बाजूला जात नाही. धनकवडी, लक्ष्मीनगर, गणेश पेठ, मार्केट यार्ड, पुणे स्टेशन याभागात रस्त्यावर गायी, गुर्हांचे प्रमाण अधिक आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून पाळीव मोकाट जनावरांचा शहरात त्रास वाढला असताना महापालिकेत आणि नगरसेवकांकडे या संदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढल्या असल्या तरी कारवाई मात्र होताना दिसत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.