Bhosari : ‘इंद्रायणी थडी’च्या माध्यमातून महिला बचत गटांना बळकटी (व्हिडिओ)

महिला व बालकल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे यांची माहिती

एमपीसी न्यूज – पुण्यात आयोजित केली जाणारी ‘भीमथडी’, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित केली जाणारी ‘पवना थडी’ अशा जत्रेच्या धर्तीवर भोसरीसह समाविष्ट गावांसाठी स्वतंत्र जत्रा आणि कार्यक्रम आयोजित केले जावेत, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि महिलांनी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत शिवांजली सखी मंचच्या माध्यमातून भव्य ‘इंद्रायणी थडी’ यात्रा सुरू केली. त्याला परिसरातील महिला आणि बचत गटांनी उदंड प्रतिसाद दिला. बचतगट चळवळ बळकट करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम लक्षवेधी ठरला आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे यांनी दिली.

स्वीनल म्हेत्रे म्हणाल्या, “आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनातून साकारलेल्या इंद्रायणी थडी जत्रेला दोन दिवसात तुडुंब गर्दी झाली. बचत गटांना मदत करण्यासाठी फ्री स्टॉल ही संकल्पना राबवण्यात आली. यामुळे बचत गटांना मिळालेला मोबदला पूर्णतः बचत गटांचा होता. यामुळे त्यांना शहरात रोजगाराची संधी उपलब्ध झाली. तसेच महिलांच्या कलागुणांना, कौशल्यांना वाव मिळाला. महिलांच्या आर्थिक वाटचालीसाठी इंद्रायणी थडी जत्रेत खास महिलांसाठी नोकरी महोत्सव आयोजित करण्यात आला. एका दिवसात सुमारे 1 हजार 230 महिलांनी मुलाखती दिल्या. त्यातील 354 महिलांना तात्काळ ऑफर लेटर देण्यात आले.

महिला बचतगटांचा उपयोग केवळ निवडणुकांच्या तोंडावर मतांचा जोगवा मागण्यासाठी केला जात होता. मात्र, मतदारसंघातील माता-भगिनींसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे. याकरीता शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने ‘इंद्रायणी थडी’ जत्रेचे आयोजन केले. महाराष्ट्रभर नावलौकिक निर्माण झालेल्या जत्रेला चार दिवसांमध्ये तब्बल पाच लाख नागरिकांनी भेट दिली. भोसरी मतदारसंघातील 580 महिला बचतगट व वैयक्तिक महिलांनी या जत्रेत सहभाग घेतला.

इंद्रायणी थडी जत्रेत सुमारे साडेचार कोटी रुपयांची उलाढाल झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी जत्रेला भेट दिली. इंद्रायणी थडीच्या माध्यमातून लहान मुलांसाठी बालजत्रा, महिलांसाठी भजन स्पर्धा, गावरान खाद्य महोत्सव, महिला आरोग्य शिबिर, फॅशन शो, डान्स स्पर्धा, महिला उद्योजकता मार्गदर्शन, होम मिनिस्टर कार्यक्रम, महिलांसाठी पारंपरिक खेळ, महिलांसाठी जॉब फेअर, योग व झुंबा ऐरोबिक्स प्रशिक्षण आदी उपक्रम राबवण्यात आले असल्याचेही म्हेत्रे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.