Pune News : कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणणा-यांविरूद्ध कठोर कारवाई

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा इशारा

एमपीसी न्यूज : शहरात कायदा आणि सुव्यस्थेला बाधा निर्माण करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार करणा-या  गुंडांविरोधात  कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा  पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे. कारागृहातून सुटल्यानंतर जल्लोषात मिरवणूक काढणा-या  कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांनी द्रुतगती मार्गावर धुडगुस घातला होता. याप्रकरणी पोलिस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे.

_MPC_DIR_MPU_II

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि  जरब बसविण्यासाठी गुंडांविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. सामान्यांना वेठीस धरणाऱ्यांची खैर केली जाणार नाही. गुन्हेगारांकडून शक्तीप्रदर्शन करणे,  जमाव जमविणे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. कायदा-सुव्यस्थेला बाधा पोहचविणा-या गुंडांविरोधात यापुढील काळात कडक  कारवाई करण्यात येणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

नागरिकांच्या रक्षणासाठी पोलीस आहेत. त्यांना उत्तर देण्यास मी बांधील आहे. सामान्यांना त्रास देणाऱ्या गुंडांविरोधात कडक कारवाईची मोहिम  तीव्र करण्यात येणार आहे. तळोजा कारागृहातून बाहेर पडलेल्या गजानन मारणेला मंगळवारी कोथरूड पोलिसांनी अटक केली. पोलिसांकडून अशा प्रकारची कारवाई होईल, याची पुसटशी कल्पना त्याला नव्हती. त्यामुळे  कारवाईतून गुंडांनी धडा घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

मारणेवर केलेली कारवाई म्हणजे ‘ट्रेलर’च आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास देणा-या गुंडांविरोधात कोणताही मुलाहिजा न बाळगता कारवाई केली जाणार आहे, असा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like