Talegaon Dabhade News : करवसुली साठी कठोर उपाय योजना राबविणार : नानासाहेब कामठे

एमपीसी न्यूज  – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून यावर्षी 80 टक्के करवसुली करण्याचे उद्दिष्ट करसंकलन विभागाने ठेवले आहे.  त्यासाठी कठोर उपाय योजना राबविणार असल्याचे प्रभारी मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांनी सांगितले.   

तळेगाव शहरात एकून 35 हजार मिळकतदार आहेत. आत्तापर्यत करसंकलन विभागाकडे 38 टक्के मालमत्ता कर वसूल झाला असल्याचे कर निरीक्षक विजय शहाणे यांनी सांगितले.

यावर्षी सुमारे 11 महिन्यात अत्यल्प वसुली झाली आहे. आर्थिक वर्षातील  शेवटच्या आठवड्यातील काही दिवस शिल्लक असल्याने प्रभारी मुख्याधिकारी कामठे यांनी कर संकलनासाठी सर्व वसुली अधिका-यांबरोबर चर्चा करून वसुलीबाबत विशेष मोहीम राबविण्याचे ठरविले आहे.

यामध्ये नागरिकांना मिळकतकर भरण्यासाठी ध्वनीक्षेपकाद्वारे आवाहन करणे, शहरातील मध्यवर्ती ठिकाणी जाहिरात फलकाद्वारे नागरिकांना मिळकतकर भरण्यासंदर्भी माहिती देणे,  प्रत्येक प्रभागात वसुलीसाठी कॅम्प उभारणे, ऑनलाईन कर भरणा करून घेणे, सुटीच्या दिवशी कर भरणा चालू ठेवणे, तसेच कर भरणा करण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली असून  नागरिकांनी आपला मालमत्ताकर भरून प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन यावेळी प्रभारी मुख्याधिकारी  कामठे यांनी केले आहे.

तळेगाव शहरात पंधरा हजार नळजोड असून आत्तापर्यंत या विभागाकडून 68 टक्के पाणीपट्टीची वसुली झाली असल्याचे विभाग प्रमुख स्मिता गाडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.