Pimpri News : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी काटेकोर नियोजन आणि उपाययोजना हव्यात

उन्मुक्त युवा संघटनेकडून उपमुख्यमंत्र्यांना पत्र

एमपीसी न्यूज – कोरोना साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉकडाऊन न करता काटेकोर नियोजन आणि उपाययोजना करणे गरजेचे आहे. याबाबत उन्मुक्त युवा संघटनेने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवले आहे. त्यात संघटनेने कोरोनाला आवर घालण्यासाठी विविध उपाय सुचवले आहेत.

राज्यात पुन्हा एकदा कोरोना साथीने जोर धरला आहे. दररोज हजारोंच्या संख्येने कोरोनाच्या नवीन रुग्णांची भर पडत आहे. मागील वर्षी याच दिवसांमध्ये कोरोनाने थैमान घातले होते. त्यामुळे लॉकडाऊन न करता कोरोनाला हद्दपार करण्यासाठी काटेकोर नियोजन आणि उपाययोजना करणे फार गरजेचे आहे.

कोरोना साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉकडाउन हा उपाय नाही आणि तो करणे आपल्याला परवडणारे नाही. मागच्या वर्षी आपल्याकडे लस नव्हती. ती आता उपलब्ध झाली आहे. तेव्हा लसीकरणाचा वेग वाढवणे महत्वाचे आहे. याव्यतिरिक्त आणखी काही उपाय करावे लागणार आहेत. उन्मुक्त युवा संघटनेने सुचवलेले उपाय खालीलप्रमाणे –

# प्रभाग स्तरावर ‘कोविड 19 दक्षता समिती’ स्थापन करण्यात याव्यात. यात स्थानिक नगरसेवक, महापालिका कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचा प्रतिनिधी, व्यापारी प्रतिनिधी, डॉक्टर प्रतिनिधी यांचा समावेश असावा. ही समिती प्रभागातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असेल आणि हॉस्पिटल मधील बेड व्यवस्थापनाकडे देखील लक्ष देईल.

कुठल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या पाहिजेत याची शिफारस पालिका आयुक्त अथवा प्रशासन प्रमुखाला करेल. तसेच गरज भासल्यास नगरसेवकांच्या सहाय्याने त्यांच्या जनसंपर्क कार्यालयांचे वार्ड स्तरीय वॉर रूम तयार करावे.

# प्रभाग स्तरावर स्थानिक महापालिका आणि खासगी प्रॅक्टिस करणा-या डॉक्टर, आरोग्य सेवा देणा-या कर्मचा-यांची टीम तयार करावी. या टीमकडे प्रभागातील यापूर्वी सकारात्मक चाचणी आलेल्या व्यक्तींच्या चाचण्या करण्याची जबाबदारी असावी. ही टीम सबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन बी.पी, ऑक्सिजन पातळी इत्यादी प्राथमिक चाचण्या करेल आणि गरज भासल्यास हॉस्पिटलमध्ये जाण्याची शिफारस करेल. हे केल्यास हॉस्पिटल मधील अनावश्यक गर्दी कमी होईल आणि सकारात्मक चाचणी आलेल्या व्यक्तींना बेडसाठी, वैद्यकीय उपचारांसाठी स्वतः बाहेर पडावं लागणार नाही.

# शहरात उपलब्ध असणारे सी.सी.सी.सेंटर, खासगी हॉस्पिटल, महापालिकेचे हॉस्पिटल, चाचणी केंद्रे (सरकारी/खासगी), लसीकरण केंद्र(सरकारी/खासगी) यांची माहिती, पत्ता, संपर्क इत्यादी प्रभागनिहाय पालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध करावेत. स्थानिक वृत्तपत्रांच्या, वेब पोर्टलच्या माध्यमातून त्याची प्रसिद्धी करावी. तसेच पालिकेच्या संकेतस्थळावर रुग्णालयांकडून बेडची माहिती रोजच्या रोज अद्यावत करण्यात येत नाही, ती त्यांना दिवसातून दोन ते तीन वेळेस करण्यास बंधनकारक करावे. जेणेकरून नागरिकांना आणीबाणीच्या परिस्थितीत कोणाला संपर्क करावा आणि कुठली पावलं उचलावीत याची माहिती मिळत राहील.

# कोविड चाचणी केलेले प्रत्येक रिपोर्ट प्रथम आरोग्य विभागाकडे सादर करणे बंधनकारक करावे. सकारात्मक चाचणी आलेल्या व्यक्तींच्या घरी जावून वैद्यकीय टीमने आवश्यक चाचण्या कराव्यात आणि होम आयसोलेशन सांगितल्यास त्यांना कुठल्या खबरदा-या घेतल्या पाहिजेत याची माहिती देवून त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची चाचणी बंधनकारक करावी.

# हाऊसिंग सोसायटीमध्ये फैलावाचे प्रमाण सर्वाधिक दिसत आहे. त्यामुळे एका मजल्यावर एक जरी व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्यास संपूर्ण मजल्यावरील प्रत्येक व्यक्तीची चाचणी करावी.

# सार्वजनिक ठिकाणे, वाहतूक नियमितपणे निर्जंतुक करावी. तसेच स्थापन केलेल्या भरारी पथकांच्या कारवाईस अजून वेग देणे गरजेचे आहे. नागरिकांनी नियम पाळावेत म्हणून वेळ पडल्यास स्वतः पालिका आयुक्त, महापौर, पोलीस आयुक्त, विरोधी पक्ष नेत्यांनी रस्त्यावर उतरून भरारी पथकासोबत कारवाई करण्यात सहभाग घ्यावा, ज्यामुळे नागरिकांना याचे गांभीर्य कळेल.

# या उपायोजना राबवल्या गेल्यास काही अंशी नियोजनात सुटसुटीतपणा येईल. एकाच विभागवार ताण येणार नाही. कारण या लढाईत सर्व विभागांच्या कर्मचाऱ्यांना सहभागी करून घ्यावे लागणार आहे. यामुळे निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी देखील करता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.