Chinchwad : निगडीतील सामूहिक अत्याचार घटनेतील गुन्हेगारांना कठोर शासन करा – सुलभा उबाळे

एमपीसी न्यूज – मागील सहा महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत अल्पवयीन मुलींवरील अत्याचारामध्ये वाढ झाली आहे. निगडी येथे शुक्रवारी तरुणीच्या तोंडावर गुंगीचे औषध फवारून अपहरण करण्यात आले. त्यानंतर तीन जणांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ चौकशी करावी, तसेच गुन्हेगारांना कठोर शासन करावे, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सुलभा उबाळे यांनी केली.

सुलभा उबाळे यांनी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांना निवेदन दिले. यावेळी मिनल यादव, वेदश्री काळे, वैशाली मराठे, प्रतीक्षा घुले, वैभवी घोडके, शशिकला उभे, अक्षदा शेळके, मनिषा परांडे आदी उपस्थित होते.

उबाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये महिला अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. महिलांविषयक कायदे कठोर आहेत. मात्र, त्यांची अंमलबजावणी होत नसल्याने शिक्षेचे प्रमाण अत्यल्प आहे. परिणामी महिलांवरील अत्याचाराची बाब चिंता करणारी आहे. गेल्या पाच महिन्यांमध्ये बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यांचा आलेख चिंताजनक आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील आयटी पार्क आणि बड्या कंपन्या असल्याने परराज्यातून अनेक तरुणी येथे शिकण्यासाठी, नोकरीसाठी येतात. गेल्या काही दिवसांमध्ये हिंजवडी, ताथवडे या आयटी पार्क परिसरात महिलांवरील हल्ले आणि अत्याचाराचे प्रकार समोर आले आहेत.

महाविद्यालयांमध्ये मुलींच्या छेडछेडीचे प्रकार वाढले आहेत. शाळेमध्ये बदनामी नको अथवा शाळा, महाविद्यालयात जाणे बंद होईल, या भीतीने विद्यार्थीनी तक्रार करण्यास धजावत नाहीत. महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्तपदी महिला अधिकारी असूनही महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये होणारी वाढ लाजिरवाणी आहे. निगडी अत्याचार प्रकरणाची तातडीने चौकशी करून नराधमांना गजाआड करावे, अशी मागणी उबाळे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like