Pimpri : अवैध व्यवसाय करणा-या माफियांविरुध्द कठोर कारवाईची मागणी 

एमपीसी न्यूज – सर्रास अवैध व्यवसाय करणा-या माफियाविरुध्द कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे शहर संघटक जितेंद्र ननावरे यांनी  पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांच्याकडे लेखीनिवेदनांद्वारे केली आहे. 

दिलेल्या निवेदनांत म्हटले आहे की,  भोसरी येथील महात्मा फुलेनगर एमआयडीसी, लांडेवाडी येथे अवैध् रित्या काळे धंदे सुरु असून या संदर्भात परिसारातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडल्याचे चित्र दिसून येत आहे. महात्मा फुलेनगर व लांडेवाडी झोपडपट्टी मध्ये गेले अनेक वर्षापासून गावठी हातभट्टी दारू, ताडी विक्री, मटका व्यवसाय, सोरट, जुगार व गांजा विक्री असे मोठ्या प्रमाणावर काळे धंदे सुरु आहेत. या सर्व धंद्यामुळे युवा पिढी देशोधडीला लागण्याचा प्रकार वाढला आहे. वस्ती मध्ये बहुदा या धंद्यामुळे भांडणे, मारामारी व गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. झोपडपट्टीतूनच गुन्हेगाराचा जन्म होतो. संबंधित गुन्हेगारांना खतपाणी घालण्याचे काम हे अवैध धंदेवाले करतात.

या परिसरामध्ये कोणीही यांच्या विरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केला तर संबंधित व्यक्तीला दहशत व दडपशाही करून धमकाविण्याचा प्रयत्न करतात. या वस्ती मध्ये प्रामुख्याने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील गरीब नागरिक उदरनिर्वाह करतात. परंतु या अवैध धंद्याच्या आहारी गेल्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक व महिला वर्गामध्ये अवैध धंदा बंदीचे सूर उमटू लागले आहेत. या अनुषंगाने विचार करून संबंधित मटका व्यवसाय, हातभट्टी दारू व ताडी विक्री,जुगार, सोरट, गांजा विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती. अन्यथा वस्ती मधील नागरिकांच्या वतीने व शिवसेना पद्धतीने जनआंदोलन करण्यात येईल.

या संदर्भात  पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-१ मकरंद रानडे  यांच्याकडेही तक्रार करून निवेदन दिले परंतु यावर नाममात्र कारवाई करण्यात आले असून अद्यापही हातभट्टी दारू विक्री करणे,ताडी विक्री करणे, मटका,जुगार,सोरट, गांजा इत्यादी प्रकार सर्रासपणे सुरु आहे. या अनुषंगाने या अवैध धंद्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांना निवेदन दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.