Nigdi News : बेकायदेशीरपणे दारूसाठा केल्याप्रकरणी कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांसोबत झटापट

सहा जणांना अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे घरामध्ये दारूसाठा केला. याबाबत माहिती मिळाल्याने निगडी पोलिसांचे एक पथक कारवाई करण्यासाठी गेले असता सहा जणांनी मिळून पोलिसांनी कारवाई करू नये यासाठी पोलिसांसोबत हुज्जत घातली. त्यातील एकाने पोलिसाची गचांडी पकडून शिवीगाळ केली.

याबाबत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना बुधवारी (दि. 7) सायंकाळी प्राधिकरण निगडी येथे घडली.

करण भरत सोनार (वय 23), अर्जुन भरत सोनार (वय 20), दिपेश भरत सोनार (वय 19), भरत अमर सोनार (वय 45), मनीषा भरत सोनार (वय 22), गीता भरत सोनार (वय 40, सर्व रा. पी एफ कार्यालयाशेजारी, प्राधिकरण निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार सतीश जालिंदर ढोले यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या घरात विक्रीसाठी बेकायदेशीरपणे दारूसाठा केला होता. याबाबत माहिती मिळाल्याने निगडी पोलिसांचे एक पथक आरोपींच्या घरी गेले. पोलिसांनी 97 हजार 145 रुपये किमतीच्या 518 विदेशी दारू आणि बिअरच्या बाटल्या जप्त केल्या.

याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करू नये म्हणून आरोपी करण याने फिर्यादी पोलीस हवालदार यांची गचांडी पकडली. तर इतर आरोपींनी पोलिसांना शिवीगाळ व दमदाटी केली. पोलिसांनी कारवाई करू नये म्हणून आरडाओरडा करून गोंधळ घालून पोलिसांसोबत आरोपींनी झटापटी करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.