Aundh : विद्यार्थी प्राध्यापकांनी गुणात्मक आणि मूल्यात्मक संशोधन करायला पाहिजे – डॉ. विजय नारखेडे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

एमपीसी न्यूज – शिक्षण घेताना विद्यार्थ्याने विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच  शिक्षकाने पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना कौशल्ययुक्त शिक्षण द्यायला पाहिजे. आपण सर्वांनी बदलत्या शैक्षणिक धोरनांचा अवलंब करायला पाहिजे. तसेच विद्यार्थी प्राध्यापकांनी गुणात्मक आणि मूल्यात्मक संशोधन करायला पाहिजे, असे मत उच्च शिक्षण विभाग पुणे येथील डॉ. विजय नारखेडे यांनी व्यक्त केले.  
औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात मराठी व इंग्रजी विभाग आयोजित राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न झाले. ‘बदलती शैक्षणिक धोरणे व रयत शिक्षण संस्थेची वाटचाल’  या विषयावर हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागाचे अध्यक्ष  अँड. राम कांडगे होते.  यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बीजभाषक  म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील  माजी कुलगुरू  डॉ. पंडित विद्यासागर, ज्येष्ठ लेखक समीक्षक पुण्याचे डॉ. दीपक बोरगावे, मीनल सासणे आदी उपस्थित होते.
संशोधक अभ्यासकांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की,  बदलत्या शैक्षणिक धोरणाचा विचार करताना प्रत्येक संस्थेने विद्यापीठावर अवलंबून न राहता,  स्वतंत्रपणे कार्य करणे गरजेचे आहे. म्हणूनच शासनाने स्वायत्त  धोरणाचा अवलंब केलेला दिसून येतो. अभ्यासक्रम हा शिक्षणाचा गाभा आहे. तसेच शिक्षणाला मर्यादा नाही. विद्यार्थ्यांच्या मनातील कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांना सातत्यपूर्ण शिक्षण देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांने शैक्षणिक क्षेत्रात येणाऱ्या अडचणींचे रूपांतर संधीमध्ये करायला पाहिजे.

मीनल सासणे यांनी कर्मवीर आण्णांच्या आयुष्यातील खाजगी आठवणींना उजाळा दिला.एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोपाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ लेखक समीक्षक पुण्याचे डॉ. दीपक बोरगावे  उपस्थित होते. ते म्हणाले बदलत्या शिक्षण पद्धतीत गरीबांपासून शिक्षण वंचित केले जात आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या कमवा शिका योजनेमुळे श्रमाची प्रतिष्ठा जोपासली जात आहे. सामाजिक,  शैक्षणिक, राजकीय प्रकारची परिस्थिती झपाट्याने बदलत चालली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनगट आणि मेंदू यांचा विकास करायला हवा. तसेच समाजात सांस्कृतिक परिवर्तन होण्यासाठी आपण व्यवस्थेला प्रश्न विचारायला हवेत. अशा स्वरूपाचे मत  व्यक्त केले
समारोहाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागाचे अध्यक्ष मा. अँड. राम कांडगे उपस्थित होते. त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. बहुजन समाजाच्या उद्धारासाठी 4 ऑक्टोबर 19 19 रोजी काले सातारा या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून,  कर्मवीर अण्णांनी बहुजन समाजात शैक्षणिक क्रांती घडऊन आणली. बहुजन समाजातील  विद्यार्थ्यांसाठी शाहू बोर्डाची स्थापना केली. तेव्हा महात्मा गांधी म्हणाले की, भाऊराव जे मला  साबरमती आश्रमात करता आले नाही. ते तुम्ही या ठिकाणी करून दाखवले. त्यामुळे तुमचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. तसेच 132 झाली गांधी आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला. या  करारानंतर कर्मवीरांनी पांडवनगर या ठिकाणी युनियन बोर्डिंगची  स्थापना केली. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेला त्यागाची आणि कष्टाची  परंपरा असल्याचे दिसून येते. तसेच  रयत शिक्षण संस्था ही  सामाजिक परिवर्तनाची  कार्यशाळा असल्याचे मत मा. अँड. राम कांडगे यांनी व्यक्त केले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ मंजुश्री बोबडे  म्हणाल्या की,  रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी  महोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयामध्ये विविध उपक्रम सुरू असून,  त्याचाच एक भाग म्हणून हे एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आले आहे. जागतिकीकरण,  खाजगीकरण आणि उदारीकरणात सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय बदल झपाट्याने होत आहेत. त्यामुळे बदलती शैक्षणिक धोरणे कोणती आहेत. आणि रयत शिक्षण संस्थेची 1919 पासून आजपर्यंतची वाटचाल या अनुषंगाने विचार मंथन करण्याच्या निमित्ताने,  हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रासाठी महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील विविध महाविद्यालयातील संशोधक,  अभ्यासकांनी आपले शोधनिबंध सादर करून,  बदलत्या शैक्षणिक धोरणांवर आणि रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीवर प्रकाश टाकला आहे. असे मत व्यक्त केले.
या चर्चासत्राचे समन्वयक मराठी विभाग प्रमुख डॉ. संजय नगरकर आणि इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. सविता पाटील यांनी हे चर्चासत्र यशस्वीपणे पार पाडले. या चर्चासत्रामध्ये डॉ. सुधाकर शेलार,  मा. प्राचार्य डॉ. शोभा इंगवले,   प्राचार्य डॉ. मगदूम   उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ,  डॉ. सुप्रिया पवार,  डॉ.तानाजी हातेकर,  डॉ. सुहास निंबाळकर, प्रा. एकनाथ झावरे,  प्रा. किरण कुंभार, प्रा. मयूर माळी,  प्रा.कुशल पाखले,  प्रा. भक्ती पाटील, प्रा. सायली गोसावी,  प्रा.नलिणी पाचर्णे,  प्रा. हर्षकुमार घळके,  प्रा. प्रदीप भिसे,  डॉ. अतुल  चौरे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.