Ravet : वेळीच मदत मिळाल्याने शालेय विद्यार्थ्याचे वाचले प्राण

एमपीसी न्यूज – रस्ता ओलांडताना टेम्पोच्या धडकेत झालेल्या अपघातात जखमी शालेय विद्यार्थ्याला वेळीच मदत मिळाल्याने त्याला जीवदान मिळाले. ही घटना आज (दि 1) सकाळी पावणेनऊच्या सुमारास रावेत बास्केट ब्रिज येथे घडली. 

अभिजित दत्ता जाधव (वय 12, रा. वाल्हेकर वाडी ), असे अपघात झालेल्या मुलांचे तर रघुनाथ कुदळे (रा. भूमकर वस्ती, वाकड), असे टेम्पो चालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिजित हा 12 वर्षीय शाळकरी मुलगा सकाळी बास्केट ब्रिज येथे रस्ता ओलांडताना टेम्पोच्या धडकेत गंभीर जखमी झाला. अपघाताच्या ठिकाणाहून पिंपरी-चिंचवड अग्निशमन वाहन चालले होते. त्यांचा समोरच हा अपघात झाल्याने वाहनातील कर्मचारी सुरज गवळी, विशाल लाडके, प्रतीक जराड यांनी अॅम्बुलन्सला त्वरित संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क होऊ शकला नाही. शेवटी अॅम्बुलन्सची वाट न पाहता अग्निशमन जवानांनी त्यांच्या अग्निशमन वाहनातच त्या मुलाला जवळच असलेल्या यूनिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. परंतु त्याठिकाणी त्याच्यावर उपचार होऊ शकले नाही.

त्यामुळे अपघातग्रस्त मुलाला अग्निशमन वाहनांमध्ये स्टर्लिंग हॉस्पिटल प्राधिकरण या ठिकाणी घेऊन गेले. अभिजितच्या घरी संपर्क होत नव्हता. त्यामुळे शाळेतून चौकशी करून तो जिथे राहतो त्याच्या घरी अपघाताबद्दल माहिती देण्यात आली. त्यानंतर त्याच्या घरच्यांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली तोपर्यंत त्याच्यावर उपचार सुरू झाले होते. गाडी चालक रघुनाथ कुदळे यांनीही या मदत कार्यात जवानांना मोठी मदत केली. वेळीच मदत मिळाल्याने मुलाला जीवदान मिळाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.