Dapodi: राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक संस्थांच्या उपक्रमाची घेतली माहिती

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी, समाजातील समस्या समजाव्यात, त्याची जाणीव व्हावी, दु:ख समजावे या उद्देशाने दापोडीतील सी.के.गोयल महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक संस्थांना भेट दिली. संस्थेच्या कार्याची माहिती घेतली.

भोसरीतील श्रीमती पताशीबाई रतनचंद लुंकड चॅरिटेबल या संस्थेला विद्यार्थ्यांनी भेट दिली. संस्थेअंतर्गत चालविण्यात येणा-या अंधशाळा, निसर्ग उपचार, योग प्रशिक्षण केंद्र आणि गोशाळेची माहिती घेतली. तसेच जागतिक अंध दिनाचे औचित्य साधत अंधशाळेतील विद्यार्थ्यांची शिक्षण पद्धती, कला कार्यानुभव, संगणक, क्रीडा योग विभाग, वस्तीगृह, भोजन व्यवस्था, वर्गअध्यापन पद्धत, अंधाची ब्रेनलिपी वयाविषयी माहिती घेतली. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न समजावून घेतले. शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग साळुंके, सामाजिक कार्यकर्ते संभाजी भांगरे यांनी अंधशाळेतील उपक्रमाची माहिती दिली.

अंध शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. त्याला विद्यार्थ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. तसेच विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त बनविलेल्या मेणबत्ती, पणत्या, आकाश कंदील याची विक्री करण्यास मदत करण्याचे आश्वासन राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी दिले.

प्राचार्य डॉ. विकास पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. बाळासाहेब माशेरे, प्रा. सिध्दार्थ कांबळे यांनी संयोजन केले. तर, प्रास्ताविक मनोज सुरवसे यांनी केले. अनुजा शितोळे यांनी आभार मानले. निलेश कांबळे, चंद्रकांत थोरात, राहुल बनसोडे, अरबाज शेख, अजित सुर्यवंशी, विशाल कांबळे, राजश्री रेंगळे, कांचन पाडळकर, प्रणाली भालेराव, मोनिका शेलार हे विद्यार्थी सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.