Talegaon : इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेतील विद्यार्थ्यांनी पाठवली केरळ पूरग्रस्तांना आर्थिक मदत

एमपीसी न्यूज – इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने इंद्रायणी महाविद्यालय, बी फार्मसी, डी फार्मसी महाविद्यालय, कांतीलाल शहा विद्यालयातील दोन हजार विद्यार्थ्यांनी पाच लाख रुपये जमा केले. हा निधी केरळ पूरग्रस्तांसाठी देण्यात येणार आहे. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, कार्यवाह रामदास काकडे, खजिनदार केशवराव वाडेकर, उपाध्यक्ष मुकुंदराव खळदे, गोरख काळोखे, सुरेश शहा, शैलेश शहा, निरूपा कानिटकर या सर्वांच्या मार्गदर्शनातून महाविद्यालयातील 2000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन निधी संकलन केले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ संभाजी मलघे, डी फार्मसीचे प्राचार्य जी एस शिंदे, उपप्राचार्य एस एस ओव्हाळ व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थ्यी यांनी प्रभातफेरी काढून निधी गोळा केला. तळेगाव दाभाडे, माळवाडी, वराळे, वडगाव, कामशेत या ठिकाणी दुकाने, बाजारपेठा, लहान मोठे व्यापारी यांच्याकडे जाऊन विद्यार्थ्यांनी निधीचे संकलन केले. पाच लाख रुपयांचा निधी विद्यार्थ्यांनी जमा केला असून तो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच मुख्यमंत्री सहायता निधीकडे जमा केला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन केले.

प्राचार्य डाॅ संभाजी मलघे म्हणाले, “इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने केरळ पूरग्रस्तांच्यासाठी मोठया प्रमाणावर निधी संकलन करण्याचा संकल्प केला आहे. विद्यार्थ्यांनी मोठया प्रमाणावर निधी गोळा केला आहे. या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये मदतीची भावना निर्माण व्हावी, त्यांना समाजाविषयी सहानुभूती वाटावी; असा उद्देश या उपक्रमाचा आहे.” या उपक्रमासाठी महाविद्यालयातील सर्वांचे सहकार्य लाभले. संस्थेचे खजिनदार केशवराव वाडेकर व सुरेशभाई शहा यांनी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.