Pimpri : विद्यार्थ्यांनी स्वतःमधील नेतृत्व स्वानुभवाने विकसित करावे – विनोद बीडवाईक

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांनी स्वतःमधील नेतृत्व विकसित करण्यासाठी अन्य साधनांपेक्षा स्वानुभवाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन अल्फा लावल इंडिया प्रा. लि.च्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचे उपाध्यक्ष विनोद बीडवाईक यांनी केले. चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या व्यवस्थापनशास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांच्या प्रवेश सोहळा अर्थात इंडक्शन सोहळ्याच्या समारोप सत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या इंडक्शन सोहळ्याचे उद्घाटन प्रसिद्ध प्रेरणादायी व्याख्याते डॉ. शरद जोशी यांच्या हस्ते झाले. तर दाना इंडिया प्रा. लि. चे मनुष्यबळ व्यवस्थापक  राज गावडे, ललिता शर्मा, डॉ. गोफणे, सहाय्यक आरोग्य अधिकारी एम. शिंदे, प्रसिद्ध प्रशिक्षक  प्रशांत चौधरी, पारी कंपनीचे मुख्य  मनुष्यबळ  व्यवस्थापक  मुकुंद  दिघे, फ्युरेशिया इंटेरिअर कंपनीचे मनुष्यबळ  व्यवस्थापक राहुल बागळे, कॉन्सन्ट्रीक्स कंपनीचे मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचे  प्रमुख सारंग  फाटक  तसेच  प्रसिद्ध  एनएलपी ट्रेनर विवेक डोबा यांचेही मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी डॉ. वंदना  मोहांती, डॉ. पुष्पराज वाघ, डॉ. सचिन आंबेकर, डॉ. अमित गिरी, प्रा. महेश महांकाळ, अमृता तेंडुलकर, अंजली धकाते, आदिती चिपळूणकर व पवन शर्मा  आदींनी विशेष सहकार्य केले.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी कोणत्याही बाबतीत संकोच न बाळगता पुढाकार घेऊन नवनवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अमुक एखादी गोष्ट  मला समजलेली नाही, पण मग मी प्रश्न न विचारता आपले त्या ठराविक बाबतीतील अज्ञान तसेच ठेवतो. हे आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाठी खूप नुकसानदायक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेज टू कॉर्पोरेट या प्रवासात आपण अधिकाधिक रोजगारक्षम कसे होऊ यादृष्टीने प्रयत्नशील राहायला हवे, असे बीडवाईक यांनी सांगितले.

सध्याच्या औद्योगिक क्षेत्रातील हुका वर्ल्ड अर्थात अस्थिरता, अनिश्चितता, गुंतागुंत व अस्पष्टतेच्या काळात विद्यार्थ्यांनी स्वतःचे करिअर सुरक्षित करण्यासाठी स्वतःला कायम अद्ययावत ठेवणे गरजेचे असून आपल्यातील ज्ञान, कौशल्य व अनुभव वाढवतानाच आपला दृष्टीकोन हा कायम सकारात्मक व सर्वसमावेशक कसा राहील याकडे लक्ष द्यायला हवे, असे सांगितले. नजीकच्या भविष्यात गीक अर्थव्यवस्थेला सामोरे जाताना कामाचे स्वरूप, कामाची वेळ व कामाचा मोबदला हे सर्वच प्रचंड प्रमाणात बदलण्याची शक्यता गृहीत धरून भविष्यवेधी दृष्टी विकसित करायला हवी, असेही बीडवाईक यांनी सांगितले. तसेच सामाजिक माध्यमामधून स्वतःला सादर करताना आपल्यातील खरेपणा जपायला हवा, असेही नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुणाल सोनावणे तर आभार प्रदर्शन केतकी गायकवाड या विद्यार्थ्याने केले. याप्रसंगी संस्थेचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सबनीस यांनी बीडवाईक यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार  केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.