Pimpri News : भोसरी प्रभाग क्रमांक पाच मधील शाळेतच होणार विद्यार्थ्यांचे लसीकरण

नगरसेवक अजित गव्हाणे यांचा पाठपुरावा

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या पुढाकारातून भोसरीतील प्रभाग क्रमांक पाच मधील 15 ते 18 या वयोगटातील प्राथमिक व माध्यमिक शाळेमधील विद्यार्थ्यांना शाळेतच कोरोना प्रतिबंधक लस मिळणार आहे. त्या शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांसाठीच हा उपक्रम असून पहिल्या टप्प्यातील सहा शाळांमधील विद्यार्थ्यांचे लसीकरण मंगळवार (दि.25) पासून  सुरु होणार आहे. तर, उर्वरित तीन शाळांमधील विद्यार्थ्यांचे लसीकरण दुस-या टप्प्यात होणार आहे.

अजित गव्हाणे प्रतिनिधीत्व करत असलेल्या भोसरीतील प्रभाग क्रमांक पाचमधील शाळापैंकी संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, श्रमजीवी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, सिद्धेश्वर हायस्कूल, प्रियदर्शनी स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल गंगोत्री पार्क आणि ज्ञानसागर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय या सहा शाळेतील विद्यार्थ्यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण होणार आहे.  प्रभागातील शाळेतील 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी शाळेच्या आवाराताच लसीकरण करावे अशी मागणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी नगरसेवक गव्हाणे यांच्याकडे केली होती.

त्याची तत्काळ दखल घेत नगरसेवक गव्हाणे यांनी मुलांचे लसीकरण वेगात पूर्ण करण्यासाठी शाळेच्या आवारातच लसीकरण सुरू करण्याची सूचना भोसरी रुग्णालयाच्या जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋतुजा लोखंडे यांना केली. डॉ. लोखंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मुलांच्या लसीकरणासाठी शाळेतच व्यवस्था केली. न्यू प्रियदर्शनी स्कूल, प्रियदर्शनी स्कूलमधील विद्यार्थ्यांचे मंगळवारी (दि.25) सकाळी 10 ते दुपारी 4  या वेळेत शाळेतच लसीकरण होईल. या शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांनाच लस देण्यात येईल.

सिद्धेश्वर स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल गंगोत्री पार्क आणि आळंदी रोडवरील ज्ञानसागर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे गुरुवारी (दि.27) लसीकरण होणार आहे. सिद्धेश्वर स्कूल येथे सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत या तीनही शाळेतील विद्यार्थ्यांचेच लसीकरण होणार आहे. श्रमजीवी माध्यमिक विद्यालय, संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शुक्रवारी (दि.28) कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. श्रमजीवी माध्यमिक विद्यालयात सकाळी 10 ते दुपारी 4  या वेळेत या शाळेतील विद्यार्थ्यांचेच लसीकरण करण्यात येणार आहे. तर, उर्वरित तीन शाळांमधील विद्यार्थ्यांचे लसीकरण दुस-या टप्प्यात होणार आहे.

प्रभाग क्रमांक पाचमधील विद्यार्थी लसवंत होणार

”पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनापासून बचावण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस हा एकमेव सुरक्षात्मक उपाय आहे. 18 वर्षांच्या पुढील लोकांचे ब-यापैकी लसीकरण झाले. 15 ते 18 वयोगटातील मुलांचेही लवकर लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रभागातील शाळेतील मुलांच्या लसीकरणाकरिता महापालिकेने शाळेतच व्यवस्था केली. दोन टप्प्यात लसीकरण होणार आहे.

ही व्यवस्था केल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानतो. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे हा आठवडा शहरातील शाळा बंद राहणार आहेत. या काळात 15 ते 18 वयोगटातील जास्तीत-जास्त मुलांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. या वयोगटातील मुलांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर प्रशासन शाळा सुरु करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेईल. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिक्षण घेता येईल”, असा विश्वास नगरसेवक अजित गव्हाणे यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.