-MPC-TOP-MOST-BANNER-I

Chinchwad News : सामाजिक सुरक्षा पथकातील पोलीस उपनिरीक्षक निलंबित

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा पथकातील पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. भावाच्या विरोधात गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल होत असताना जमावाला भडकावले. याप्रकरणी विभागीय चौकशीची सुनावणी सुरू असताना सरकारी साक्षीदारासोबत बाचाबाची केल्याचा ठपका संबंधित उपनिरीक्षकावर ठेवण्यात आला आहे.  अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

प्रणिल मारुती चौगले असे निलंबित केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

चौगले हे वाकड पोलीस ठाण्यात नेमणुकीस असताना 4 नोव्हेंबर 2020 रोजी त्यांच्या भावाच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात येत होता. त्यावेळी वरिष्ठांची पूर्व परवानगी न घेता चौगले हे भुदरगड पोलीस ठाण्यात गेले. तेथील पोलीस कर्मचाऱ्यांशी त्यांनी हुज्जत घातली. त्यावेळी पोलीस ठाण्यासमोर मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते. भुदरगड पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी जमावाला शांत करीत होते. त्यावेळी चौगले यांनी जमावाला भडकावले. त्यामुळे तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी चौगले यांच्याकडील पिस्तूल जमा करून घेतले.

दरम्यान, चौगले यांची वाकड पोलीस ठाण्यातून बदली करण्यात येऊन सामाजिक सुरक्षा पथकात नेमणूक करण्यात आली. भुदरगड पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी चौगले यांची विभागीय चौकशी करण्यात आली. त्याची सुनावणी सुरू असताना चौकशीतील सरकारी साक्षीदारांसोबत चौगले यांनी बाचाबाची करून त्यांना धमकी देण्याचा प्रकार करून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, असा ठपका ठेवत चौगले यांना निलंबित करण्यात आले आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.