Killing Of Pregnant Elephant: हत्तिणीच्या निर्दयी मृत्यूनंतर माणुसकी या शब्दाची लाज वाटतेय- सुबोध भावे

Subodh Bhave protests against killing of elephant in kerala

एमपीसी न्यूज- केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यात स्थानिक गावकऱ्यांनी एका गरोदर हत्तिणीला फटाक्यांनी भरलेला अननस खायला दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला. २७ मे रोजी घडलेली ही घटना केरळमधील वन-अधिकाऱ्याच्या फेसबुक पोस्टमुळे समोर आली. या घटनेचा अभिनेता सुबोध भावेने निषेध केला असून संबंधितांवर कडक कारवाई केला जावी अशी मागणी केली आहे.

जी शिक्षा एखाद्या माणसाच्या मृत्यूनंतर दिली गेली असती त्याचप्रमाणे आत्ताही दिली गेली पाहिजे असं परखड मत सुबोध भावेने मांडलं आहे.

सुबोध भावेने ट्विट करत म्हटलं आहे की, “ज्या प्राण्यावर आपण उदंड प्रेम करतो, त्याला आणि त्याच्या येऊ घातलेल्या जीवाला ज्या क्रूर पद्धतीने वागवण्यात आलं ते पाहून माणूस म्हणवून घ्यायची लाज वाटतेय. जी शिक्षा एखाद्या माणसाच्या बाबतीत दिली गेली असती त्याचप्रमाणे आत्ताही दिली गेली पाहिजे”.

ही बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर एकच हळहळ व्यक्त होत आहे. अनेकांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली असून दोषींना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

या घटनेनंतर केरळ वन-विभागाने हत्तीणीच्या मारेकऱ्यांचा शोध सुरु केला आहे. आजच त्यापैकी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.