Subodh & Renuka slams Kangana: सुबोध आणि रेणुकाने घेतला कंगनाच्या वक्तव्याचा खरपूस समाचार

ताई आपल्याला जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन करा, जिथे तुम्हाला काम मिळालं, ओळख मिळाली त्या शहराचा आणि राज्याचा मान ठेवा

एमपीसी न्यूज- अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर आपल्या फटकळ कॉमेंटमुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्री कंगना राणावतने काही दिवसांपूर्वी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. कंगनाच्या या उद्योगामुळे तिच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. तरीदेखील कंगनाने आपले मत बदलले नाही. अजूनही ती वेगवेगळ्या कॉमेंट करतच आहे.

यामुळे आघाडीचा मराठमोळा अभिनेता सुबोध भावे यानेही ‘ताई आपल्याला जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन करा, जिथे तुम्हाला काम मिळालं, ओळख मिळाली त्या शहराचा आणि राज्याचा मान ठेवा’, असं म्हणत कंगनाला सुनावलं आहे.

यापूर्वी रेणुका शहाणेनेही ‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’ असं ट्विट करत कंगनाच्या वक्तव्याचा समचार घेतला. मात्र त्यावरही कंगनाने उत्तर दिल्याने रेणुका यांनी पुन्हा कंगनाला ‘मला मुंबईची पीओकेशी केलेली तुलना आवडली नाही,’ असं स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं आहे.


कंगनाच्या या ट्विटरवर प्रतिक्रिया देताना रेणुका यांनी, ‘प्रिय कंगना, मुंबई हे ते शहर आहे तिथे तुझं बॉलिवूड स्टार होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. या शहराचा तू थोडा तरी मान ठेवावा अशी अपेक्षा आहे. तू मुंबई आणि पीओकेची तुलना केली हे पटल नाही. हे म्हणजे उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’, असं ट्विट केलं.

रेणुका यांच्या या ट्विटला कंगनानेही उत्तर दिलं. ‘प्रिय रेणुकाजी, सरकारी धोरणांवर टीका करणं हे एखाद्या जागेचं कौतुक न करण्यासारखं कधीपासून झालं. तुम्ही इतक्या भोळ्या तर नक्कीच नाही. ती तुम्हीही इतर गिधाडांप्रमाणे माझे लचके तोडण्याची वाट पाहत होता?, तुमच्याकडून अधिक चांगल्या गोष्टींची अपेक्षा आहे’, असं उत्तर कंगनाने दिलं.

कंगनाच्या या उत्तरावर रेणुका यांनी मला मुंबईची पीओकेशी केलेली तुलना अजिबात आवडली नाही असं स्पष्टपणे सांगितलं. ‘प्रिय कंगना, सरकारवर टीका करण्याला माझी काही हरकत नाही. पण ‘मुंबई पीओकेसारखी वाटू लागली आहे’ हे मला मुंबई आणि पीओकेची थेट तुलना केल्यासारखं वाटतं. तू केलेली ही तुलना खूपच वाईट आहे. एक मुंबईकर म्हणून मला ही तुलना आवडली नाही. तुझ्याकडून चांगल्याची अपेक्षा करणं हा माझाच भोळेपणा असेल’, असं रेणुका यांनी सुनावलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.