Pimpri : राज्य वरिष्ठ गट ॲथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत साई स्पोर्टसच्या खेळाडूंचे यश

एमपीसी  न्यूज – महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गट ॲथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत पिंपरी चिंचवडमधील साई स्पोर्टस् ॲकेडमीच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले. मुंबई येथे झालेल्या या स्पर्धेत साई स्पोर्टस् ॲकेडमीच्या मंगेश कदम, मेलविन थॉमस आणि अंकिता कोंढे यांनी उल्लेखनीय कामगिरी करत एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदक पटकावले.

ॲथलेटिक्समध्ये वरिष्ठ गटात अत्यंत महत्वपूर्ण आणि मानाची समजली जाणारी ही स्पर्धा आहे. महाराष्ट्र राज्यातून सर्वच जिल्ह्यातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. साई स्पोर्टस्‌च्या 17 खेळाडूंची या स्पर्धेत निवड झाली होती. त्यांनी या स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी करत एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदक पटकाविले. डिकँथलॉन या प्रकारात मंगेश कदम याने सुवर्ण आणि गोळाफेक मध्ये मेलविन थॉमस याने रौप्य पदक तर अंकिता कोंढे ही 4×100 मीटर रिलेमध्ये रौप्य पदक  मिळविले.

तसेच रितेश इथापे, शिवम घाडगे, गणेश पांडियन, शुभम पवार, कुरूमुर्ती जलनिला, लहू, स्वाती शिंदे, आरती सुतार, मृणाल चोपडे, सुमिता यशोदास, वृषाली साळवे, काजल खंदारे, जागृती शिंगारे, सोनाली झोळ या खेळाडूंनीदेखील उत्कृष्ट कामगिरी केली. यातील काही खेळाडूंनी जूनमध्ये पुणे जिल्हा ॲथलेटिक्स स्पर्धेत उपविजेता संघ होण्याचा मान मिळवला होता.

पिंपरी-चिंचवड शहरात मागील 15 वर्षापासून साई स्पोर्टस् ॲकेडमी कार्यरत आहेत. या ॲकेडमीने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविले आहेत. तसेच अनेक खेळाडू पोलीस व सैन्य दलात भरती झाले आहेत. राष्ट्रीय खेळाडू रूस्तम पठाण यांचे साई स्पोर्टस् ॲकेडमीला वेळोवेळी मार्गदर्शन लाभते. महापालिकेचे क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे यांचे सहकार्य मिळते. अॅकेडमीचे मुख्य संचालक चंद्रशेखर कुदळे हे राष्ट्रीय खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय पंच आहेत. त्यांनी आपल्या गुणकौशल्य आणि अनुभवाच्या जोरावर आजपर्यंत अनेक राष्ट्रीय खेळाडू घडवलेत. तर वर्षानुवर्षे त्यांच्या मार्गदर्शनामुळे जिल्हास्तरावर साई स्पोर्टस् ॲकेडमीने आपले नाव उंचावले आहे. प्रशिक्षक मंगेश पवार आणि दिगंबर राऊत यांचादेखील ॲकेडमीच्या विकासात मोलाचा वाटा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.