Nigdi News : दीड दिवसांपासून इमारतीमध्ये अडकलेल्या घारीने घेतली भरारी

एमपीसी न्यूज – काच आणि भिंत याच्या डक्टमध्ये दीड दिवसांपासून अडकलेल्या घारीला नागरिकांनी जीवनदान दिले. ही घटना निगडी येथे आज (गुरुवारी, दि. 14) घडली. तिला बाहेर काढून दाणापाणी केले असता तिने तिचे पंख पसरून पुन्हा आकाशात भरारी घेतली.

निगडी बस स्टॉप येथे कोहिनूर आर्केड नावाची व्यावसायिक इमारत आहे. त्या इमारतीमध्ये तिस-या मजल्यावर तात्यासाहेब शेवाळे यांचे खासगी कार्यालय आहे. इमारतीच्या दुस-या मजल्यावर भिंत आणि काच याच्या डक्टमध्ये एक घार अडकली. मागील दीड दिवसांपूर्वी अन्नाच्या शोधात ही घार या डक्टमध्ये अडकली.

काच आणि भिंत यांच्या मधले अंतर खूप कमी असल्याने घारीला पंख पसरून उडता येत नव्हते. त्यामुळे घार तिथेच पडून राहिली. परिणामी ती अन्नपाण्याशिवाय तडफडत होती. गुरुवारी सकाळी घारीची तडफड तात्यासाहेब शेवाळे यांच्या निदर्शनास आली.

दरम्यान, शेवाळे यांनी प्राणी मित्रांना संपर्क केला. त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी घारीला काढण्याचा निर्णय घेतला. शेवाळे यांनी त्यांच्या कार्यालयातील एका तरुणाला भिंत आणि काच याच्या डक्टमध्ये शक्य तिथवर जाऊन कापडाच्या मदतीने घारीला बाहेर काढण्यास सांगितले. थोडा वेळ प्रयत्न केल्यानंतर घारीला सुखरूपपणे बाहेर काढण्यास त्यांना यश आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.