Indian Nevy News : ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

एमपीसी न्यूज : भारताने स्टील्थ डिस्ट्रॉयर आयएनएस चेन्नई या युद्धनौकेवरुन रविवारी ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. चाचणीदरम्यान या क्षेपणास्त्राने अरबी समुद्रातील एका लक्ष्यावर अचूक निशाणा साधला. उच्चस्तरीय आणि अत्यंत गुंतागुंतीचा युद्धाभ्यास केल्यानंतर या क्षेपणास्त्राने लक्ष्यावर अचूकपणे निशाणा साधला. ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्राइम स्ट्राइक शस्त्राच्या रुपात समुद्रातील मोठ्या अंतरावरील लक्ष्यवर निशाणा साधू शकते.

ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ४०० किमी पेक्षा जास्त अंतरावरील लक्ष्याला उद्धवस्त करु शकते. हे क्षेपणास्त्र पाणबुडी, युद्धनौका, लढाऊ विमानं आणि जमिनीवरुनही लॉन्च करता येते. भारत आणि रशियाच्या संयुक्त उपक्रमांतर्गत ते विकसित करण्यात आलं आहे.

सुरुवातीला याची रेंज २९० किमी होती. त्यानंतर ती वाढवत ४०० किमी पेक्षा अधिक करण्यात आली. काही अंदाजांनुसार, सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ४५० किमी पेक्षा अधिक अंतरापर्यंत टार्गेटला उध्वस्त करु शकतो.

भारताने यापूर्वीच लडाख आणि अरुणाचल प्रदेशात चीनसोबतच्या सीमेवरील अनेक मोक्याच्या ठिकाणी ब्रह्मोस क्षेपणास्त्रे आणि इतर प्रमुख शस्त्रे मोठ्या प्रमाणावर तैनात केले आहेत. ही चाचणी अशा वेळी झाली आहे, जेव्हा भारत आणि चीनचा सीमावाद उफाळून आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.