Moshi : पळून जाणा-या तरुणांचा पाठलाग केल्यावरून वृद्धाला मारहाण

एमपीसी न्यूज – हातामध्ये लोखंडी रॉड घेऊन पळून जाणा-या मुलांचा पाठलाग केल्याच्या कारणावरून दोघांनी मिळून वृद्धाला मारहाण केली. यामध्ये वृद्ध गंभीर जखमी झाले. ही घटना मोशी गावठाण मधील हनुमान आळी नाल्याजवळ रविवारी (दि. 21) रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली.
संदीप नारायण मंडले (वय 30, रा. हनुमान आळी, दहितुले शेजारी, मोशी गावठाण) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप रविवारी रात्री त्यांच्या घराच्या बाहेर झोपले होते. मध्यरात्री दीडच्या सुमारास अचानक कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला. त्यामुळे ते उठून बसले. दरम्यान त्यांचे सासरे सुभाष गावडे बाहेर आले. संदीप यांनी पळून जाणारी मुले गावडे यांना दाखवली. गावडे यांनी पळून जाणा-या मुलांचा पाठलाग केला. पळून जाणा-या एका तरुणाचे वय अंदाजे वीस वर्ष होते. संदीप व त्यांचे सासरे गावडे त्या तरुणांच्या मागे पळाले. मात्र पुढे अंधार असल्याने संदीप अलीकडेच थांबले. काही वेळेनंतर गावडे घरी आले. त्यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. संदीप यांनी याबाबत गावडे यांना विचारले असता गावडे म्हणाले, दोन मुलांनी त्यांचा पाठलाग करून अडविण्याचा प्रयत्न केला म्हणून लोखंडी रॉडने डोक्यात आणि हातावर मारले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.