Pune News : पुण्यात इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून तरुणीची आत्महत्या

एमपीसी न्यूज : पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून एका 26 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. त्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात याप्रकरणी घटनेची नोंद करण्यात आली आहे. राधिका पवन ससाने असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी, सिंहगड रस्ता परिसरातील माधुरी मिलिंद कॉम्प्लेक्स परिसरात ती महिला राहत होती. सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉल समोर ही इमारत आहे. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास या महिलेने चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने तिला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला आहे. या महिलेने नेमकी आत्महत्या का केली असेल  याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.