Maval : अल्पवयीन प्रेयसीचा लॉजवर खून करणाऱ्या आरोपी प्रियकराची आत्महत्या?

एमपीसी न्यूज – अल्पवयीन प्रेयसीचा लॉजवर नेऊन ब्लेडने वार करून खून केला. त्यानंतर लॉजवरून पळून गेलेल्या आरोपी प्रियकराची दुचाकी इंद्रायणी नदीच्या काठावर मिळाल्याने त्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

श्रीराम सुग्रीव गिरी असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी मयत मुलीच्या वडिलांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वडगाव मावळ येथील एका लॉजवर बुधवारी सकाळी 11 वाजता एक जोडपे आले. ते जोडपे लॉज मधील रूम नंबर 303 येथे थांबले. अज्ञात कारणावरून आरोपी श्रीराम याने अल्पवयीन मुलीच्या गळ्यावर, हातावर आणि पोटावर ब्लेडने वार करून खून केला. मुलीचा खून केल्यानंतर श्रीराम लॉजच्या खाली आला. मुलगी आवरून खाली येत असल्याचे त्याने लॉजमधील स्टाफला सांगितले. काही वेळेनंतर श्रीराम याने दुचाकीवरून लॉजवरून पोबारा केला.

घटनेची माहिती मिळताच वडगाव मावळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन आरोपीच्या शोधात पथके रवाना केली. पोलीस पथकांना आरोपीची मोटारसायकल इंद्रायणी नदीच्या किनारी पडलेली दिसली. यावरून श्रीराम याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही शक्यता पडताळून पाहण्यासाठी पोलिसांनी एनडीआरएफच्या पथकाला बोलावले आहे. एनडीआरएफकडून इंद्रायणी नदीत श्रीरामचा शोध सुरू आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.