Pune : सुसज्ज बस डेपो आणि मार्गांच्या सुसूत्रिकरणाने होईल पीएमपी सक्षम

वाहतूक तज्ज्ञ प्रसन्न पटवर्धन यांचे मत ; पीएमपी प्रवासी मंचतर्फे प्रवासी मेळावा

एमपीसी न्यूज – दिल्ली, मुंबई, चेन्नई, इंदोर, बंगळुरु येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या तुलनेत पुण्याची पीएमपीएमएल कित्येक पटीने मागे आहे. दुर्देवाने जेएनएनयुआरएम आल्यानंतरच पहिल्यांदा पीएमपीएमएल चा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून वेगळा विचार करण्यात आला. इतर शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला शासनासह सर्वांचाच सकारात्मक प्रतिसाद असून किमान एक अधिकारी पाच वर्षे टिकल्यास पुण्यातही चांगले चित्र निर्माण होईल. परंतु त्याकरीता प्राथमिक सुविधा सुधारणे गरजेचे असून पहिल्यांदा सुसज्ज बस डेपो आणि मार्गांचे सुसूत्रिकरण केल्याने पीएमपीएमएल सक्षम होऊ शकेल, असे मत वाहतूक तज्ज्ञ प्रसन्न पटवर्धन यांनी व्यक्त केले. 

पीएमपी प्रवासी मंचातर्फे म्हात्रे पूलाजवळील इंद्रधनुष्य सभागृहात विविध शहरातील प्रवासी केंद्रीत बससेवा व पीएमपीएमएल या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मंचाचे अध्यक्ष जुगल राठी, विवेक वेलणकर, सतिश चितळे, संजय शितोळे यांसह मंचचे सदस्य आणि पीएमपी बस प्रवासी उपस्थित होते.

मेळाव्यात तुषार सस्ते या पीएमपीच्या वाहकाचा प्रवाशांना सौजन्यशील सेवा दिल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. तसेच सजग व सक्रिय बस प्रवासी म्हणून वैभव कुलकर्णी, निळकंठ मांढरे, विपुल पाटील, रुपेश केसेकर, सु.वा.फडके, विराज देवधर, सतिश सुतार, जयदीप साठे यांना मोफत बस पास देऊन गौरविण्यात आले.

प्रसन्न पटवर्धन म्हणाले, सार्वजनिक वाहतुकीला विविध फॅन्सी मोड हवेत, या संकल्पनेमुळे बीआरटी, मेट्रो व इतर महागडया सेवांवर प्रचंड पैसे खर्च केले जातात. शहराचा भौगोलिक व प्रवासी संख्येच्या दृष्टीने अभ्यास केला जात नाही. शहरातील रस्त्याचा विकास हा केवळ वाहने वाहून नेण्यासाठी नाही, तर माणसे वाहून नेण्याच्या दृष्टीने केल्यास सार्वजनिक वाहतुकीला बळकटी आणता येऊ शकेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा सुरक्षित पर्याय असून शासनाने रस्ते आणि उड्डाणपूलांवर खर्च करण्यापेक्षा सक्षम सार्वजनिक वाहतुकीकरीता खर्च होणे गरजेचे आहे. नॅशनल अबर्न ट्रान्सपोर्ट पॉलिसीमध्ये याविषयी अनेक चांगल्या सूचना केल्या असून दुर्देवाने त्याचा प्रचार-प्रसार व वापर झालेला नाही. तंत्रज्ञानाचा योग्य वापर, कर्मचारी प्रशिक्षण हे देखील सार्वजनिक वाहतुकीला सक्षम करण्याकरीता आवश्यक मार्ग आहेत.

विवेक वेलणकर म्हणाले, पीएमपीएमएल प्रशासन व राज्यकर्त्यांशी लढा देण्याशिवाय प्रवाशांना पर्याय नाही. पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक सकारात्मक प्रतिसाद देखील देत नाही. पीएमपीचा कारभार समजेपर्यंत त्यांची बदली होते, त्यामुळे यातून प्रवाशांच्या हिताचे काहीच निष्पन्न होत नाही,असेही ते म्हणाले.

जुगल राठी म्हणाले, प्रशासनाने डिजिटल बोर्डांविषयी आश्वासन देऊनही काहीही झालेले नाही. शासनाकडून सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम करण्याकरीता प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे आमचा लढा यापुढेहे सुरु राहणार आहे. दुचाकीपेक्षा स्वस्त पीएमपी म्हणजे ५ रुपयात ५ किलोमीटर, प्रभावी हेल्पलाईन, डिजीटल स्थलदर्शक फलक, प्रमुख थांब्यावर सुरक्षित बसबे, संपूर्ण दरवाढ रद्द करणे या मागण्यांसाठी आमचा लढा सुरुच आहे. मेळाव्यासह प्रवासी मंचाच्या योजनेत सहभागी होण्याकरीता ९८५०९५८१८९, ९४२२०१७१५६ या क्रमाकांवर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.