Sukh Mhanje Nakki Kay Asta: सुखाची वेगळी परिभाषा सांगणारी नवी मालिका- सुख म्हणजे नक्की काय असतं

लाख गोष्टी ठरवल्या असल्या तरी विधीलिखीत जे असतं तेच होतं. यातून आपलं सुख आपण कसं शोधत जातो तेच ‘सुख म्हणजे काय असतं’ या मालिकेत खूप सुंदररित्या मांडण्यात आलं आहे.

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांचे एक नितांतसुंदर गाणे आहे, ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं…’ खरंच सुख म्हणजे नक्की काय असतं या प्रश्नाचे प्रत्येकाचे उत्तर वेगवेगळे असेल. कोणाला शांतपणे घरी बसण्यात सुख वाटेल तर कोणाला भटकंतीमध्ये सुख वाटेल. व्यक्ती तितक्या प्रकृती यानुसार प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळीच असेल. सुखाची हीच परिभाषा स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून उलगडण्यात येईल. स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती कोठारे व्हिजन्सची असून सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कणसे ही मालिका दिग्दर्शित करत आहेत. 17 ऑगस्टपासून रात्री 9.30 वाजता स्टार प्रवाहवर ही मालिका प्रसारित होणार आहे.

या मालिकेचं वेगळेपण सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं ही एक कौटुंबिक मालिका आहे. सर्वसाधारण आयुष्यात आपल्या समोर जे प्रसंग आणि जी आव्हानं येतात ती आपण पेलत जातो.

मालिकेत नेमकं हेच सांगण्याचा प्रयत्न आहे. लाख गोष्टी ठरवल्या असल्या तरी विधीलिखीत जे असतं तेच होतं. यातून आपलं सुख आपण कसं शोधत जातो तेच ‘सुख म्हणजे काय असतं’ या मालिकेत खूप सुंदररित्या मांडण्यात आलं आहे.’

अभिनेत्री वर्षा उसगावकर या मालिकेत नंदिनी ही भूमिका साकारणार आहेत. त्यांचे या मालिकेच्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनंतर पुनरागमन होणार आहे. त्यांच्याशिवाय या मालिकेत मंदार जाधव, गिरीजा प्रभू, माधवी निमकर, सुनील गोडसे, गणेश रेवडेकर भूमिका साकारणार आहेत. मंदार जाधवला या आधी स्टार प्रवाहच्या श्री गुरुदेव दत्त मालिकेत श्री दत्तांच्या भूमिकेत प्रेक्षकांनी पाहिलं आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील नव्या भूमिकेविषयी सांगताना मंदार म्हणाला, ‘श्री गुरुदेव दत्त नंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाहची मालिका करतोय याचा प्रचंड आनंद आहे. कोल्हापुरात घडणारी ही गोष्ट आहे. जयदीप असं माझ्या व्यक्तिरेखेचं नाव असून तो परदेशात शिकलेला मुलगा आहे.

जयदीप अन्यायाविरोधात नेहमी उभा ठाकतो आणि हेच त्याचं वेगळेपण आहे. आदर्श मुलगा, आदर्श भाऊ, आदर्श जावई याचं उत्तम उदाहरण म्हणून जयदीप या पात्राचा उल्लेख करता येईल. श्री दत्तांच्या रुपात प्रेक्षकांनी मला भरभरुन प्रेम दिलं त्यामुळे नव्या मालिकेतला माझा नवा अंदाजही प्रेक्षकांना आवडेल अशी आशा आहे.’

अभिनेत्री गिरीजा प्रभूचीही प्रमुख भूमिका असलेली ही पहिलीच मालिका. या मालिकेतील गौरी ही व्यक्तिरेखा साकारणं ही खूप मोठी जबाबदारी असल्याचं तिने सांगितलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.