Pune : ‘आत्म्याचे नाव अविनाश’चे रविवारी प्रकाशन

एकसष्टीनिमित्त खुद्द अविनाश धर्माधिकारी उलगडणार त्यांची यशोगाथा

एमपीसी न्यूज – माजी सनदी अधिकारी आणि चाणक्य मंडल परिवारचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी येत्या रविवारी (दि. ५) एकसष्टी साजरी करत आहेत. यानिमित्ताने खुद्द अविनाश धर्माधिकारी दृक-श्राव्य माध्यमातून आपली यशोगाथा उलगडणार आहेत. प्रसंगी प्रसिद्ध लेखिका डॉ. चित्रलेखा पुरंदरे लिखित विश्वकर्मा पब्लिकेशन्स प्रकाशित धर्माधिकारी यांच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. रविवारी (दि. ५) सायंकाळी ६.०० वाजता गणेश कला क्रीडामंच, स्वारगेट पुणे येथे हा सोहळा होणार आहे.

विश्वकर्मा पब्लिकेशनच्या पुढाकारातून साकारलेल्या ‘आत्म्याचे नाव अविनाश’ या शीर्षकाच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते होणार आहे. या प्रकाशन सोहळ्या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राघुनाथ माशेलकर, राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी यांची विशेष उपस्थिती असणार आहे. प्रकाशनानंतर कवी संदीप खरे यांच्या कवितांचे सादरीकरण होणार आहे, अशी माहिती विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे संपादक मनोहर सोनावणे व सहसंपादक संदीप तापकीर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.