Pimpri News : पाळीव प्राण्यांसाठी औंधमध्ये सुपर स्पेशालिटी व्हेटेरिनरी हॉस्पिटल 

इमारतीसाठी पालिका देणार दोन कोटी

एमपीसी न्यूज – पाळीव प्राण्यांना आवश्यक सोय सुविधांचे आधुनिकीकरण व स्पेशलाईज सेवा देण्यात येणार आहेत. त्याकरिता पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीसाठी औंध येथे एक सुपर स्पेशालिटी व्हेटेरिनरी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. हॉस्पिटलच्या बांधकामासाठी पिंपरी महापालिका दोन कोटी रुपयांचा निधी देणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती सभेसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-याने औंध येथील सुपर स्पेशालिटी व्हेटेरिनरी हॉस्पिटलसाठी दोन कोटी रुपयांचा निधी देण्याबाबत महापालिकेला 2 सप्टेंबर 21 रोजी लेखी पत्राद्वारे विनंती केली. पाळीव प्राण्यांना आवश्यक सोय सुविधांचे आधुनिकीकरण व स्पेशलाईज सेवा उपलब्ध करुन सेवा नियमीत व प्रभावी व्हावी. यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीसाठी औंध येथे एक सुपर स्पेशालिटी व्हेटेरिनरी हॉस्पिटल नियोजित आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये पाळीव प्राणी (लहान व मोठे) यांची संख्या जास्त आहे. दिवसेंदिवस पाळीव प्राणी पाळण्याची अभिरुची वाढत आहे. त्यामुळे संख्येमध्ये भर पडत आहे. तसेच शहराची पार्श्वभूमी पाहता ग्रामीण भागाचे एकत्रीकरण होऊन शहराची निमिर्ती झाली आहे. त्यामुळे मोठी जनावरे पाळण्याचे प्रमाण देखील लक्षणीय आहे. या पशुधनावर वेळेवर उच्च दर्जाच्या तज्ज्ञांकडून रोग निदान, उपचार, शैल्यचिक्तिसा होणे आवश्यक आहे.

औंध येथील हॉस्पिटलमध्ये या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पशुंसाठी हे हॉस्पिटल जीवनदायी ठरणार आहे. हॉस्पिटलचा फायदा शहरातील नागरिकांना, त्यांच्या पशुधनास होणार आहे. तत्पर तज्ज्ञतेची पशुरोग निदान आणि उपचार मार्गदर्शन सल्ला देण्याबाबतच्या सेवा, शासकीय पशुवैद्यकांद्वारे माफक शासकीय दराने उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे हॉस्पिटलच्या बांधकामासाठी 2 कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यासाठी नव्याने शिर्षक तयार करुन त्या लेखाशिर्षकावरील तरतूदीमधून खर्ची टाकणे योग्य राहील.

सद्यस्थितीत पशुवैदद्यकीय विभागात 2 कोटी कोणत्याही लेखाशिर्षकावर उपलब्ध नाही. यासाठी विभागातील चिखली येथील कोंडवाडा चालविण्याचा खर्च या लेखाशिर्षकावरील 50 लाख रुपयांची तरतूद सुपर स्पेशालिटी व्हेटेरिनरी हॉस्पिटल या नवीन लेखाशिर्षाकावर वर्ग करणे योग्य राहील. तर, उर्वरीत दीड कोटी रक्कम बांधकामाच्या प्रमाणात सन 2022-23 या आर्थिक वर्षाच्या तरतुदींमधून द्यावी.

व्हेटेरिनरी हॉस्पिटल बांधकामासाठी 2 कोटींचा निधी देणे, नवीन लेखाशिर्षक तयार करणे, चिखलीतील कोंडवाडा चालविण्याच्या लेखाशिर्षकावरील 50 लाख नवीन लेखाशिर्षकावर वर्ग करणे, व्हेटेरिनरी हॉस्पिटल बांधकामासाठी 2 कोटींचा निधी पशुसंवर्धन उपायुक्तांच्या नावे देण्यास स्थायी समिती, महासभेची मान्यता घेतली जाणार आहे.

हॉस्पिटलमार्फत या सुविधा उपलब्ध  होणार!
# पिंपरी-चिंचवड हद्दीसाठी चोवीस तास रुग्णवाहिका
# आयपीडी सुविधा (अंतर रुग्णविभाग)
# सर्व प्रकारचे शल्यचिकित्सा
# तज्ज्ञ मार्गदर्शकामार्फत पशु पालकास मार्गदर्शन व सल्ला
# सर्व प्रकारच्या रोग निदान, उपचार सेवा माफक दरामध्ये

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.