Lonavala : मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून रेल्वे स्थानकाची पाहणी

डिजिटल फलक, गार्डन व उपहारगृहाचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी आज लोणावळा रेल्वे स्थानकाची पाहणी करत नव्याने उपलब्ध करण्यात आलेल्या सुख सुविधांची तसेच डिजिटल बोर्ड, सेल्फी पाॅईट, लोको शेड प्रदर्शन यांची पाहणी केली. यावेळी रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेले डिजिटल फलक, संत शिरोमनी नामदेव महाराज गार्डन व उपहारगृहाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

मध्य रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल, मुंबई विभागीय प्रबंधक शैल्लभ गोयल यांनी लोणावळा रेल्वे स्थानकाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत मावळचे खासदार श्रीरंग बारणे, रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता सुरेश पाखरे, सेक्शन अभियंता के.आर.डांगे, सहाय्यक अभियंता अजय मेहरा, लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते. 

रेल्वेचे महाप्रबंधक व विभागीय प्रबंधक रेल्वे स्थानकाला भेट देण्याकरिता येणार असल्याने मागील आठवडाभरापासून स्थानक परिसराची साफसफाई व स्वच्छता करण्यात आली होती. वास्तविक लोणावळा रेल्वे स्थानकाला देशातील काही निवडक रेल्वे स्थानकामध्ये समाविष्ट करुन त्याचा विकास करण्यात आल्याने हे स्थानक लोहमार्गावरील लक्षवेधी स्थानक बनले आहे.

सर्व अत्याधुनिक सुविधा येथे उपलब्ध आहेत. असे असले तरी मागील आठवडाभरातील स्वच्छता, निटनेटकेपणा वाखण्याजोगा होता. रेल्वे स्थानकावर नव्याने मदतकक्ष उभारण्यात आला आहे तसेच उपहारगृह, स्वच्छतेकरिता जागोजागी लिटरबीन बसविण्यात आल्या आहेत. बाजारपेठ भागातील तिकिट घराचे सुशोभिकरण, गार्डन, भव्य दुचाकी व चारचाकी वाहनांची पार्किंग तसेच रिक्षांकरिता क्यू थांबा बनविण्यात आला असून स्थानकाचा परिसर हा गर्दुले व भिकारी मुक्त करण्यात आला होता. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.