पुण्यातील सोसायट्या आणि रुग्णालयांना ‘रीपोस’कडून ‘डोअर – टू – डोअर’ डीझेल पुरवठा

Pune : लॉकडाउनच्या काळात राष्ट्रीय माहिती केंद्र, रुग्णालयात आणि सोसायटीजमध्ये मुख्य कामे थांबू नयेत यासाठी ‘रीपोस’ ही संस्था ‘डोअर – टू – डोअर’ डीझेल वितरण करत आहे. पुणे स्थित घरपोच डीझेल पुरवणारी स्टार्टअप संस्था ‘रीपोस एनर्जी’ यांनी रुग्णालये, गृहसंस्था आणि कचरा व्यवस्थापन डेपो यांना मदत करण्याचे ठरविले आहे.

महाराष्ट्र कोरोना व्हायरस महामारीचे केंद्रबिंदु बनले आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि एकूणच संपूर्ण देश सध्या लॉकडाऊन आहे. ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

राज्यात कोरोना संक्रमित लोकांचा आकडा १००च्या वर गेला आहे. यामुळे रुग्णालयांना त्यांचे काम अबाधित सुरु ठेवण्यात अडचण येत आहे. मंगळवारी झालेल्या पावसामुळे अनेक रुग्णालयांना वीज कपातीचा तडाखा देखील बसला. त्यांना पावर बॅकअपसाठी डीझेलची आवश्यकता होती. त्यांच्या मदतीसाठी रीपोस एनर्जी धावून आले.

“रुग्णालयांमध्ये दररोज साधारण ५०० ते २००० लीटर डीझेलची आवश्यकता असते. आम्ही पुण्याच्या अनेक महत्वाच्या रुग्णालयांपर्यंत पोहोचत आहोत. यामध्ये सह्याद्री, जहाँगीर आणि आदित्य बिर्ला रुग्णालय आणि राष्ट्रीय माहिती केंद्र यांचा देखील समावेश आहे, ” अशी माहिती रीपोसच्या सह संस्थापिका अदिती भोसले वाळुंज यांनी दिली.

पुण्यातील डोअर – टू – डोअर डीझेल पोहोचविण्याऱ्या रीपोस एनर्जीची सुरुवात साधारण तीन वर्षांपूर्वी झाली. रतन टाटांमार्फत या स्टार्टअपला फंडिंग केले जाते. गेल्या २ वर्षांपासून अनेक ग्राहकांना रीपोस आपल्या सेवा देत आहे. मात्र लॉकडाऊन झाल्यापासून रीपोसच्या सेवांसाठी १५% मागणी वाढली आहे.

“रुग्णालयांमध्ये नेहमीच बॅकअपची आवश्यकता असते. खासकरून व्हेंटीलेटर आणि आयसीयूमधील मशीन्सचा वापर अबाधित रहावा, यासाठी ही गरज नक्कीच असते,” अशी माहिती अदिती यांनी दिली. “सध्याच्या घटकेला रीपोसचे २ पेट्रोल पंप्स कार्यरत आहेत. जे साधारण २२ मोठ्या आणि काही लहान रुग्णालयांमध्ये सतत सेवा पोहोचवितात आहेत, ” असेही त्यांनी सांगितले.

एकूण ४ कर्मचारी आळीपाळीने डीझेल पोहोचविण्याचे काम करत आहेत. “वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितलेले सर्व नियम आमचे कर्मचारी काटेकोरपणे पाळताएत, ते सॅनिटायझर्सचा वारंवार वापर करताएत तसेच सुरक्षा वस्त्र देखील घालताएत, मास्क घालताएत याची आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत, ” अशी माहिती रीपोसचे संस्थापक चेतन वाळुंज यांनी दिली.

“पुढील २० दिवसांपर्यंत व्यवस्थित पुरेल इतके डीझेल आहे. काही गृहसंस्था आणि कचरा व्यवस्थापन डेपोंना देखील आम्ही डीझेल पुरवत आहोत. जेणेकरुन त्यांचे काम बाधित होणार नाही,” असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.