Lonavala : राजकारणात मूल्य व सिद्धांताची जपणूक करणार्‍या भाजपला साथ द्या – योगी आदित्यनाथ

एमपीसी न्यूज – राजकारणात परमार्थ मूल्य विचार व सिद्धांताची जपणूक करणार्‍या भाजपला साथ द्या, असे आवाहन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मावळवासीयांना केले.

मावळ विधानसभेचे भाजपा, शिवसेना, रिपाई महायुतीचे उमेदवार बाळा भेगडे यांच्या प्रचाराकरिता लोणावळा शहरात आयोजित सभेत योगी आदित्यनाथ यांनी मावळवासीयांना मार्गदर्शन करताना स्वार्थी राजकारणावर टीका केली.

यावेळी राज्यमंत्री बाळा भेगडे, रिपाईचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, शिवसेना मावळ तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, प्रचारप्रमुख रवींद्र भेगडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, लोणावळा शहराध्यक्ष श्रीधर पुजारी, शिवसेना शहराध्यक्ष सुनील इंगूळकर, रिप‍ाईच्या महिलाध्यक्षा यमुना साळवे, रघुवीर शेलार बिंद्रा गणात्रा, शौकत शेख, भरत हारपुडे, मोतीराम मराठे, देविदास कडू, शरद हुलावळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना योगी म्हणाले राजकारण हे स्वार्थाचे नसावे ते परमार्थ, आदर्श, मूल्यावर आधारित असावे. सत्ता राष्ट्राला समर्पित असल्यास विकास कसा होतो हे मागील पाच वर्षात देशाने पाहिले आहे. मागील 70 वर्ष देशाचे विभाजन करणारे काँग्रेस पक्षाने लादलेले कलम 370 मोदी सरकारने रद्द करत देशाला एक भारत श्रेष्ठ भारत बनविले.

महिला सशक्तीकरणाकरिता तिहेरी तलाक विरुद्ध कायदा करत मुस्लिम महिलांना सन्मान मिळवून दिला. अन्नदाता शेतकरी सन्मानाकरिता किसान सन्मान योजना, आयुष्यमान भारत योजना, उज्जवला गॅस योजना, स्वच्छतागृह दिले, घरकुल योजना, युवकांना रोजगार दिला, शहिदांच्या कुटुंबियांना मोठा आर्थिक आधार दिला, देशाचा व महाराष्ट्राचा विकास करण्याकरिता मोठ्या प्रमाणात रस्त्यांचा विकास केला, नवीन कारखानदारी आणली. शेवटी जो विकास करणार त्याला जनता साथ देणार हा सिद्धांत आहे. बाळा भेगडे यांनी 1400 कोटी रुपयांचा निधी आणत मावळात विकास केला. त्यांची योग्यता व क्षमता पाहून त्यांना भाजपाने पुन्हा संधी दिली आहे. भेगडे यांनी मावळ तालुक्याला विकासाच्या वेगळ्या उंचीवर नेले आहे.

राजकारण करताना विचारधारा नसली तर असे स्वार्थी राजकारण समाजाचे व राष्ट्राचे नुकसान करते. सिद्धांतहीन राजकारण म्हणजे मृत्यूचा फंदा असल्याने संधीसाधू मंडळींना सत्तेपासून दूर ठेवा. शिवसेना व भाजपा यांची मूल्यनिती एक असल्याने हे दोन्ही पक्ष युतीच्या माध्यमातून एकत्र राजकारण करतात. या निवडणुकीत देखील या मुल्यांची जपणूक केली जाणार आहे. भाजप शिवसेना रिपाईच्या सरकारने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचारी राजकारणाला आळा घालण्याचे काम केले आहे. पाच वर्षापूर्वी देशात व राज्यात आतंकवाद व दहशतवाद माजला होता. आज पाच वर्षानंतर देशात व राज्यात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगितले.

राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मनोगतात मावळात केलेल्या विकासकामांचा पाडा वाचून दाखवत काय विकास केला म्हणणार्‍यांनी समोर येऊन बसावे, असे आवाहन विरोधकांना केले. मी शिवरायांचा मावळा आहे, राजकारण निष्ठेने करतो, फसवा फसवी माझ्या रक्तात नाही, मावळातील जाधववाडी येथील जमिनीचा प्रश्न, पवना धरण बाधितांचा जमिनीचा प्रश्न, रिंगरोड, कार्ला व नवलाख उंब्रे एमआयडीसीचा विषय ही अनेक वर्षाची रखडलेली कामे मार्गी लावली. शेतकर्‍यांची जमीन शेतकर्‍यांना परत देण्याची भावना मनात असावी लागते, ती आमच्याकडे होती म्हणून विषय मार्गी लागले. पवना जलवाहिनीचे राजकारण नाही केले तर शहिदांच्या वारसांना नोकर्‍या दिल्या, 179 शेतकर्‍यांवर दाखल झालेले गंभीर स्वरुपाचे गुन्हे मागे घेतले. भविष्यात देखील शेतकर्‍य‍ांवर अन्याय होऊ देणार नाही, असा शब्द यावेळी मावळवासीयांना दिला.

नगराध्यक्षा सुरेखा जाधव, रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे व भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेश खांडभोर यांनी त्यांच्या भाषणांमध्ये सुनील शेळके यांच्या आरोपांचा समाचार घेतला. यावेळी व्यासपीठावर आलेल्या माकडाचे उदाहरण देत वाघमारे म्हणाले माकडाला निष्ठा कळते पण एका ताटात खाणार्‍यांना कळत नाही. मावळात उड्या मारणार्‍या या माकडाला थांबविण्याचे आवाहन भाजपप्रमाणे शिवसैनिक व भीमसैनिकांनी स्वीकारले आहे. सुरेखा जाधव म्हणाल्या मावळात रडणारा हवा की विकासाकरिता लढणारा हे दाखवून देण्याची वेळ आली आहे.

आज मतदारांना विकत घेण्याची भाषा वापरली जात आहे, आज तुम्हाला कोणी चार आणे देईल व उद्या मागून घेईल पण बाळा भेगडे यांनी शासनाच्या माध्यमातून तुमचा पैसा तुमच्या विकासाकरिता वापरला आहे हे ध्यानात ठेवा, लोणावळा शहरात आम्ही जनतेकरिता 24 तास काम करतो या कामाला व लोणावळ्याच्या विकासाला मत द्या, असे आवाहन जाधव यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.