Pune : विद्यापीठाच्या डास-निर्मूलन व स्वच्छता मोहिमेला सर्व कर्मचारी संघटनांचा पाठिंबा, सक्रिय सहभाग

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे, पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने हाती घेण्यात आलेल्या डास-निर्मूलन व स्वच्छता मोहिमेला विद्यापीठातील सर्व कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दर्शवला असून, त्यात सक्रिय सहभागही घेतला आहे.

या संदर्भात विद्यापीठातील संघटना- भारतीय कामगार सेना, कर्मचारी संघ, इंटक कामगार संघटना, पॅन्थर कामगार संघटना, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक हनुमान मंडळ, बौद्ध सहायक संघ, आर्य क्राडी मंडळ आणि श्री वीर गोगादेव सर्व सेवा मंडळ यांनी निवेदन प्रसिद्ध केले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, विद्यापीठाच्या आवारात डेंग्यू, मलेरिया, चिकूणगुन्या यासारख्या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी तातडीचे व दीर्घकालीन उपाय आखणे आवश्यक आहे. त्यासाठी कुलगुरू यांच्या निर्देशानुसार, विद्यापीठ आणि पुणे महापालिका यांनी संयुक्तपणे विद्यापीठ आवारात १२ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत “डास-निर्मूलन व स्वच्छता पंधरवडा” आयोजित केला आहे. त्यात सर्व शिक्षकेतर कर्मचारी व रहिवाशांनी सक्रिय सहभाग घ्यावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.