Pune News: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे ग्रामीण भागाचा श्वास मोकळा – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज : बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा जणू श्वास आहे. या शर्यती थांबल्यामुळे तो श्वासच कोंडला होता. सुप्रीम कोर्टाने शर्यतींना परवानगी दिल्यामुळे तो जणू मोकळा झाला आहे. अशा शब्दांत भाजपा प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, बैलगाडा शर्यतीस सशर्त परवानगी देऊन यावरील बंदी आज सुप्रीम कोर्टाने उठवली. याचा आज संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष होत आहे.  सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राची ग्रामीण मानसिकता लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याने मी सुप्रीम कोर्टाचे मनापासून आभार मानतो.

सन २०११ मध्ये बैलांना संरक्षित प्राणी म्हणून ग्राह्य धरले गेल्याने बैलगाडा शर्यतीवर बंदी आली. प्रकाश जावडेकर यांनी बैल या प्राण्यास संरक्षित प्राणी यादीतून बाहेर काढले होते. पण दुर्दैवाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. यानंतर तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र यांसह अनेक राज्यांमध्ये याविरोधात तीव्र आंदोलने झाली. तमिळनाडू सरकारने या आंदोलनानंतर त्यांच्या विधीमंडळात कायदा करुन, संपूर्ण राज्यात लागू केला‌. त्यानंतर कर्नाटक आणि महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात कायदा केला गेला.

ते पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांच्या काळातील कायद्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. पण हा विषय सर्वोच्च न्यायालयात असल्याने यावर निर्णयाची सर्वच प्रतिक्षा करत होते. सुप्रीम कोर्टाने आज या शर्यतीला सशर्त परवानगी दिल्याने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण आहे. या विषयासाठी भारतीय जनता पक्षाचे आ. महेश लांडगे, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आदींनी प्रचंड परिश्रम घेतले. या तिघांचेही मनापासून अभिनंदन करतो!”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.