Supriya Sule : लोकशाहीमधील विरोधी पक्षांची, विरोधी विचारांची ‘स्पेस’ भाजपाला मान्य नाही

एमपीसी न्यूज – लोकशाही व्यवस्थेत (Supriya Sule) अत्यावश्यक असणारी विरोधी पक्षांची आणि विचारांची ‘स्पेस’ भाजपाला मान्य नाही, महाराष्ट्रातील जनतेला भावणारे आणि त्यांच्या हितासाठी सदैव काम करणारे पक्ष आणि माणसे कटकारस्थाने करून संपवण्याचा घाट भाजपाने घातला आहे. त्यासाठी केंद्रातील एजन्सीजचा बेसुमार गैरवापर केला जातोय, पाण्यासारखा पैसा ओतला जातोय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर शरद पवार अन् बाळासाहेब ठाकरेंचा फोटो शेअर करत भाजपावर केली.

त्यांनी पुढे म्हंटले, की आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात राहणारा प्रत्येकजण ‘मराठी माणूस’ अशी मराठी माणसाची व्याख्या केली होती. महाराष्ट्रीय माणसांनी प्रचंड मेहनत करुन, प्रागतिक विचार जोपासत विकसित महाराष्ट्राची उभारणी केली. अनेक क्षेत्रांत देशाला दिशा दाखविण्याचे काम केले.

पण केंद्र आणि राज्यात सत्तेवर असणाऱ्या भाजपाने येनकेनप्रकारे मराठी माणसांनी मोठ्या कष्टाने उभारलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष विधिनिषेध शून्य मार्गांनी फोडले, असेही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

स्व. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविली. त्याचप्रमाणे आदरणीय पवार साहेबांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करुन ती देशभरात पोहोचविण्याचे काम केले. या दोन्ही नेत्यांनी आपल्या कुटुंबाचा समाजकार्याचा वारसा घेऊन प्रचंड मेहनतीने डोंगराएवढे (Supriya Sule) कार्य उभे केले व देशभरात दबदबा निर्माण केला.

गेली साठ वर्षे या दोन्ही नेत्यांचे विचार आणि नेतृत्व मान्य करुन लाखो कार्यकर्त्यांनी हे पक्ष उभे केले. याबद्दल आम्ही सदैव त्यांच्या ॠणात आहोत. देशातील व महाराष्ट्रातील मायबाप जनतेने स्व.बाळासाहेब ठाकरे व आदरणीय पवार साहेबांना भरभरून प्रेम दिले.

पण त्यांची ही ताकद व हे प्रेम भाजपला बघवत नाही. आदरणीय पवार साहेबांनी तीन वेळा कर्करोगाशी झुंज दिली. प्रत्येक वेळी ते जनतेचे प्रेम आणि आशिर्वाद यांच्या बळावर जनसेवेसाठी बरे होऊन पुन्हा कामाला लागले. यासाठी माय-बाप जनतेचे आम्ही कायम ऋणी आहोत.

Pune : ‘लावणी ठसका’ कार्यक्रमाला उत्साही प्रतिसाद!

महाराष्ट्रातील जनतेला भावणारे आणि त्यांच्या हितासाठी सदैव काम करणारे पक्ष आणि माणसे कटकारस्थाने करून संपवण्याचा घाट भाजपाने घातला आहे. त्यासाठी केंद्रातील एजन्सीजचा बेसुमार गैरवापर केला जातोय, पाण्यासारखा पैसा ओतला जातोय.

महाराष्ट्रातील जनतेमध्ये आपापसात भांडणे लावून, त्यांची ताकद (Supriya Sule) खच्ची करून भाजपला आनंद मिळतो, परंतु, या तत्वशून्य फोडाफोडीतून राज्याची प्रतिमा मालिन करण्याचे पाप भाजप करत आहे. लोकशाही व्यवस्थेत अत्यावश्यक असणारी विरोधी पक्षांची आणि विचारांची ‘स्पेस’ भाजपाला मान्य नाही, हेच सातत्याने अधोरेखित होते आहे. असेही सुप्रिया सुळे यांनी  सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.