Suresh Raina : सुरेश रैनाच्या काकांची हत्या झाल्याची माहिती 

Suresh Raina's uncle killed in robbery attempt in Pathankot.

एमपीसी न्यूज – भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपरकिंग्जचा खेळाडू सुरेश रैना आयपीएल सोडून भारतात परतला आहे. कारण त्याच्या काकांची हत्या झाली असल्याची माहिती आहे. पंजाबच्या पठाणकोट जिल्ह्यात दरोडेखोरांच्या हल्ल्यात क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या 58 वर्षीय काकांची हत्या झाली आहे. एबीपी माझा ने याबाबत वृत्त दिले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना पंजाबच्या पठाणकोटमधील थारियाल गावात घडली. दरोडेखोरांच्या हल्ल्यात त्याच्या कुटुंबातील चार जण जखमी झाले आहेत. तर या हल्ल्यात सुरेश रैनाचे काका अशोक कुमार यांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत अशोक कुमार यांचे ज्येष्ठ बंधू श्याम लाल यांनी ते रैनाचे काका असल्याची पुष्टी केली आहे. सुरेश रैना लवकरच याठिकाणी भेट देण्यास येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, कुख्यात ‘काळे कच्छेवाला’ टोळीतील तीन ते चार जण घर लुटण्याच्या हेतूने आले होते. पठाणकोटच्या माधोपूरजवळील थारियाल गावात ते अशोक कुमार यांच्या घरात घुसले आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर हल्ला केला.

पठाणकोटचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक गुलनीतसिंग खुराणा यांनी सांगितलं की, हल्ल्याच्या वेळी सर्व जण आपल्या घराच्या गच्चीवर झोपले होते.

अशोक कुमार यांच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्याच रात्री त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती त्यांनी दिली.

या हल्ल्यात त्यांची आई सत्या देवी, त्यांची पत्नी आशा देवी, मुले अपिन आणि कुशल हे जखमी झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सचे कार्यकारी संचालक केएस विश्वनाथन यांनी सुरेश रैना वैयक्तिक कारणामुळे भारतात परतला असून तो या आयपीेल हंगामासाठी उपलब्ध असणार नसल्याचे सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.